
नांदेड – नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व राजकीय मंडळींना लाजवेल असा भव्य रोजगार मेळावा घेत शनिवारी नांदेडच नव्हे तर परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील उपस्थित असलेल्या ६ हजार ३८ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ५०२ तरुणांना रोजगार मिळवून दिला. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पहिल्यांदाच घेतलेल्या या रोजगार मेळाव्यास उदंड प्रतिसाद मिळाला. पोलीस दलाचे उत्कृष्ट नियोजन आणि देशभरातील विविध कंपन्यांचा या मेळाव्यातील सहभाग हा निश्चितच लक्षणीय राहिला. त्यामुळे पोलिसांनी मिशन सहयोग अंतर्गत घेतलेल्या मिशन उडानला यश मिळाल्याचे स्पष्ट झाले. या यशानंतर शनिवारी सायंकाळपासूनच समाज माध्यमावर पोलीस दलाच्या या कार्याचे कौतुक करा त्यांना सलाम केला जात आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस मुख्यालयात तीन मे रोजी मिशन उडान अंतर्गत भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला. शिक्षण घेतल्यानंतरही अनेक युवकांना रोजगार मिळत नाही; परिणामी अनेक युवक नैराश्यातून चुकीचे पाऊल उचलत गुन्हेगारीकडे वळतात. त्यातून लहान मोठे गुन्हेही करतात. यामुळे अशा युवकांच्या जीवनाची दिशा बदलतेस मात्र त्यातून समाज स्वास्थ्य बिघडते. हीच बाब ओळखून नांदेड जिल्हा पोलीस दलाने सुशिक्षित बेरोजगार युवक गुन्हेगारीकडे वळू नये या उद्देशाने मिशन उडान अंतर्गत हा रोजगार मिळावा घेतला.
या मेळाव्यात भारतातील सर्व उद्योग क्षेत्रातील ९७ नामांकित कंपन्यांनी भाग घेतला. या मेळाव्यात ९ हजार १५ युवकांनी ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन केले होते. या रोजगार मेळाव्याला प्रत्यक्ष ६ हजार ३८ युवक युवतींनी उपस्थिती दर्शवली. मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या या रोजगार मेळाव्यात तीन दिव्यांगानाही रोजगार उपलब्ध झाला आहे. या मेळाव्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या मदतीला युवाशक्ती फाउंडेशन आणि २४× ७ या कंपन्यांनी सहकार्य केले. जिल्हा पोलीस मुख्यालयात झालेल्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या युवक युवतींसाठी उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आल्या होत्या. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भव्य टेंट, कुलर, पंखे यांची व्यवस्था करण्यात आली होती. बाहेर गावाहून येणाऱ्या युवक युवतींसाठी जेवणाचीही पोलीस दलाकडून व्यवस्था करण्यात आली होती.
पोलीस दलाच्या रोजगार मेळाव्यासाठी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुनील जी. वेदपाठक, विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील, खा. डॉ. अजित गोपछडे, खा. रवींद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर, नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, एकनाथ पवार यांनी उपस्थिती दर्शवली.
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे. त्याचवेळी हा रोजगार मेळावा पारदर्शकपणे पार पडला. या मेळाव्याबाबत कोणाची काही तक्रार असेल तर ८३०८२७४१०० आणि ७७७४०८९१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.
समाज माध्यमांवर आय लव नांदेड पोलीसचा ट्रेंड..! या मेळाव्याच्या यशस्वीतेची बातमी शनिवारी सायंकाळपर्यंत पुढे आली. त्यावेळी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी नांदेड जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या या कार्याचे मोठ्या मनाने आणि खुल्या दिलाने कौतुक केले. जे नांदेड जिल्ह्यातील राजकारण्यांना जमले नाही ते पोलिसांनी करून दाखवले, अशा शब्दात पोलिसांच्या या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. त्याचवेळी वर्दीतील देव, राजकारणातील पुढार्यांना मागे टाकणारा प्रशासनातील पुढारलेला अधिकारी, समाजाची गरज ओळखणारा अधिकारी अशा अनेक शब्दात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह नांदेड पोलीस दलाचे समाज माध्यमांवर कौतुक केले जात आहे. पोलिसांबद्दल समाजात काही अंशी असलेला नकारात्मक दृष्टिकोन नांदेड पोलिसांच्या या यशस्वी मेळाव्यानंतर निश्चितच कमी होण्यास मदत झाली आहे.