
जुन्या नांदेडातील पैलवान टी हाऊसजवळ सक्षम ताटे या युवकाचा प्रेम प्रकरणातून जातीय द्वेष मनात ठेवत मामीलवाड कुटुंबीय आणि इतर काहीजणांनी गोळ्या झाडून तसेच डोक्यात फरशीचे घाव घालून निर्घृण खून केला होता. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पण त्याचवेळी सक्षमची प्रेयसी आंचलने केलेल्या आरोपानुसार इतवा रा ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी तिच्या भावाला या प्रकरणात सक्षमचा खून करण्यासाठी प्रेरित केले होते. तू इतरांना धमकावतोस पण तुझ्या बहिणीचे बहिणीचे मॅटर असलेल्याला का संपवत नाहीस असे म्हणून खून करण्यास प्रेरित केले. त्याचवेळी खोटा गुन्हा दाखल करण्यास नकार देणाऱ्या आंचलचा मोबाईल फोडून टाकला आणि या घटनेच्या चार तासानंतरच खुनाचा हा प्रकार घडला. या सर्व प्रकरणात माही दासलवार आणि धीरज कोमुलवार दोन पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत, ते दोन्ही पोलीस कर्मचारी मामीलवाड यांचे नातेवाईक आहेत, असा आरोप सक्षम ताटे कुटुंबीय आणि आंचलने केला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून त्या दोन्ही कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप केला आहे. सात दिवसापूर्वीच सक्षम ताटे कुटुंबीयांनी त्या कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली होती. तसेच २४ डिसेंबर रोजी आत्मदहनाचा इशाराही दिला होता; मात्र या काळात पोलिसांनी ताटे कुटुंबीयांना कोणतेही पत्र अथवा कोणतेही उत्तर दिले नाही.
परिणामी, बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सक्षमची आई, प्रेयसी आंचल यासह इतर कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पोहोचले. त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी दादासाहेब शेळके, राजेश्वर पालिमकर, आनंद कीर्तने यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आत्मदहनापासून त्यांना रोखले. यावेळी पोलिसांशी झटापटही झाली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन बोलमवाड यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचीही सक्षम ताटे यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतली. त्यावेळी अबिनाश कुमार यांनी त्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.



