
नांदेड – शहरात हरित क्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते २६ मे रोजी करण्याची जय्यत तयारी केली जात आहे. अमित शहा यांचा २६ मे रोजी नांदेड दौरा जवळपास निश्चित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आदींनी पुतळा परिसराची पाहणी केली आहे.
शहरातील नागार्जुना हॉटेल कॉर्नर परिसरात पुतळा उभारणीबाबत २८ फेब्रुवारी २००८ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता प्रदान केली होती. नांदेड महापालिकेने हरित क्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेसाठी ६० लाख ६८ हजार रुपये खर्च केले आहेत. तर १४ लाखांचा नऊ फूट उंचीचा पुतळा तयार करण्यात आला आहे. या पुतळ्याच्या जागेसाठी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी खाजगी जागा महापालिकेला हस्तांतरण करण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला. त्यानुसार नांदेड महापालिकेने वखार महामंडळाची १३२० चौरस फूट जागा तसेच ११८३.४८ चौरस फूट अशी एकूण २५०३.४८ चौरस फूट जागा खरेदी केली. या जागेसाठी महापालिकेने ६० लाख ६८ हजार रुपये अदा केले.
पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न सुटल्यानंतर नांदेड महापालिकेने २३ मे २०१८ रोजी पुतळा निर्मितीच्या कामाचे आदेश दिले. या पुतळ्याचे शिल्पकार गुजरात राजकोट येथील दृष्टी आर्ट झोन हे आहेत. पुतळ्यासाठी कला संचनालय मुंबईकडून २१ जानेवारी २०२२ रोजी मान्यता मिळाली; तर चौथरासाठी मुंबईच्या मुख्य वास्तू विशारद यांनी ३० जून २०२२ रोजी परवानगी दिली आहे. महापालिकेने पुतळा परिसरातील सुशोभीकरण कामासाठी ५९ लाख ३५ हजार ५३५ रुपये किंमत निश्चित करत दोन वेळा निविदा प्रसिद्ध केल्या.
या निविदा प्रक्रियेत २ कंत्राटदारांनी निविदा भरल्या होत्या. त्यामध्ये बी.जी. भास्करे यांना निविदा किंमतीवरील सात टक्के जास्त दराची निविदा मंजूर करून काम देण्यात आले होते. या सुशोभीकरणाच्या निविदा प्रक्रियेस महापालिका स्थायी समितीने ८ ऑगस्ट २०२२ रोजी मंजुरी दिली. त्यानुसार हे सर्व काम पूर्ण झाले आहे. पुतळा आणि सुशोभीकरणाचे काम जवळपास दोन महिने आधी पूर्ण झाले होते. या पुतळ्याच्या उद्घाटनाची प्रतीक्षा नांदेडकरांना होती. आता खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन होणार असल्याने नांदेडकरांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
दरम्यान, नांदेडमध्ये होणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात दक्षता घेतली जात आहे. जिल्ह्यात संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोन उडवणे आणि चित्रीकरण करण्यास २५ मे ते २० जलैपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणावर ही ड्रोन बंदी घालण्यात आली आहे. त्याचवेळी नांदेड जिल्हा दौरा अनुषंगाने नियोजित सभा भेटी आणि कार्यक्रम शांततेत पार पडावे, या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून महाराणा प्रतापसिंह चौक ते वसंतराव नाईक चौक, अण्णाभाऊ साठे चौक, नवीन मोंढा, शंकरराव चव्हाण पुतळा, महात्मा फुले पुतळा आयटीआय चौक, शिवाजीनगर औद्योगिक वसाहत आणि आनंदनगर चौक या भागात तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तसेच दौऱ्याच्या ठिकाणी, जिल्हाधिकारी कार्यालय, महात्मा गांधी पुतळा ते महावीर चौकपर्यंतच्या परिसरातील मुख्य रस्त्यावर २५ मे रोजी सकाळी सहा वाजेपासून ते बुधवार २८ मे पर्यंत उपोषण, आत्मदहन, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह आदी आंदोलन करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.