नांदेड – नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने डॉ. संतुक हंबर्डे आणि विधानसभेसाठी नांदेड उत्तर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर यांना तर नांदेड दक्षिणमध्ये शिंदे गटाचेच आनंदराव बोंढारकर यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी महायुतीच्या लोकसभा आणि विधानसभेच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. नांदेड उत्तरमध्ये मरळक येथील विमलेश्वर महादेव मंदिर आणि नांदेड दक्षिण मतदारसंघात विष्णुपुरी येथील काळेश्वर महादेव मंदिरात प्रचाराचे नारळ फोडण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री, भाजपाचे नेते खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचीही अनुपस्थिती होती. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा नांदेडचा गड नेमका कोण सांभाळणार आहे, याबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत.
नांदेड लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी जवळपास ६० हजार मतांनी चिखलीकरांचा पराभव केला होता. मात्र दुर्दैवाने त्यांचे २४ ऑगस्ट २०२४ रोजी निधन झाले. त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने एकमताने दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या सुपुत्र डॉ. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली. प्रा. रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी दाखल करताना झालेल्या शक्ती प्रदर्शनाने पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये नांदेडच्या लोकसभा जागेबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी नांदेड लोकसभा मतदारसंघातील सर्व सहाच्या सहा जागेवर काँग्रेसला महाविकास आघाडीतील घटकपक्षाने उमेदवारी देऊन एक नवा इतिहास रचला आहे. त्यामुळे मतदानादरम्यान क्रॉस वोटिंगचा फटका बसणार नाही याची काळजी घेतली आहे. नांदेडमध्ये उत्तर मतदारसंघात अब्दुल सत्तार यांच्या रूपाने तब्बल ४० वर्षानंतर मुस्लिम उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरविला आहे. नांदेडमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर मतदारसघात काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य पाहता विधानसभेतही याच लीडची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे भाजपाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपूर्वी एक दिवस आधी डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी दिली. दोन्ही बड्या नेत्यांच्या पसंतीच्या उमेदवारांच्या यादीमध्ये हे नाव नव्हते हेही विशेष. त्यामुळेच आता त्यांनी प्रचाराकडेही पाठ फिरवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाकडून सुनियोजित पद्धतीने लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार होईल असे अपेक्षित होते. मात्र सोमवारी प्रचाराच्या नारळ फोडण्यासाठी झालेल्या सभेतील प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीची चर्चाच मोठ्या प्रमाणात झाली.
नांदेड तालुक्यातील मरळक येथील विमलेश्वर महादेव मंदिरात सोमवारी सकाळी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार डॉ. संतुक हंबर्डे आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण आणि माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर या दोन्ही नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र या जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख नेत्यांनी भाजपाच्या नांदेड पोटनिवडणुकीतील लोकसभा उमेदवाराच्या प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या सभेला त्यामुळे जिल्ह्यात आता भाजपाच्या प्रचाराची धुरा नेमकी कोणाच्या हातात राहणार आणि भाजपाचा हा गड सांभाळण्यासाठी कोण पुढे येणार याकडेही लक्ष लागले आहे. या कार्यक्रमास राज्यसभा खा. डॉ. अजित गोपछडे यांच्यासह विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील, प्रवीण साले, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष शीतल भालके, प्रदेश सचिव महादेवी मठपती, महानगराध्यक्ष श्रद्धा चव्हाण, शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अपर्णा नेरलकर, महानगर उत्तर प्रमुख अनुराधा गिराम, लीना गायकवाड, अश्विनी सोनुले आदींची उपस्थिती होती. त्यानंतर सोमवारी दुपारीच नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आनंद बोंढारकर आणि डॉ. संतुक हंबर्डे यांच्या प्रचाराचा दक्षिणमध्ये विष्णुपुरी येथील काळेश्वर महादेव मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला. या कार्यक्रमासही जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या दोन्ही प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती होती. काळेश्वर येथील महादेव मंदिर येथे नारळ फोडून शुभारंभ करताना उपनेते तथा आमदार हेमंत पाटील, खा. डॉ. अजित गोपछडे, शिवसेनेचे उमेदवार आनंदराव बोंढारकर, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. संतुक हंबर्डे, प्रवीण साले, चैतन्य देशमुख, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, मोतीराम पाटील, शहर प्रमुख तुलजेश यादव, शितल खांडील, शितल भालके, बजरंग ठाकूर, विजय गंभीरे आदींची उपस्थिती होती.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर फेब्रुवारी २०२४ मध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढेल असा कयास लावला जात होता. त्यांच्या प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय निश्चित मानला गेला होता. मात्र २०२४ च्या निकालात घडले उलटेच. भाजपाचे उमेदवार माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभेच्या निकालापासून या दोन्ही नेत्यातील अंतर दिवसेंदिवस वाढत गेले. पुढे लोहा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भाजपाला जय श्रीराम करत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि उमेदवारीही मिळवली. आता ते लोहा मतदारसंघात स्वतःच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांच्या प्रचारासाठी नांदेड जिल्ह्यातून भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी लोहा मतदारसंघात धाव घेतली आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मोठी कुमक लोहा मतदारसंघात पोहोचली असल्याचे चित्र आहे. तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या बालेकिल्ला असलेल्या भोकर मतदारसंघात त्यांच्या कन्या ॲड. सुजया चव्हाण यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी भोकरमध्ये माजी खासदार अशोकराव चव्हाण हे गेल्या दोन महिन्यापासून वेगवेगळ्या सभा घेत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले गिरीश महाजन यांचे भोकर मतदारसंघात दोन दौरे आतापर्यंत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने झाले आहेत. आगामी काळातही भाजपाच्या बड्या नेत्यांच्या सभा भोकर मतदारसंघात होणार आहेत याबाबतचे सुक्ष्म नियोजन केले जात आहे. नांदेडमधील बहुतांश आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते हे भोकर मतदार संघात ठाण मांडतील हेही स्पष्टच आहे.
जिल्ह्यातील दोन्ही बडे नेते आपापल्या मतदारसंघात प्रचारात गुंतले आहेत. त्यांचे समर्थक पदाधिकारी, कार्यकर्तेही त्या त्या मतदारसंघात रवाना झाले आहेत. त्यात लोहा मतदार संघ तर नांदेड लोकसभा मतदारसंघात समाविष्टही नाही. त्यामुळे प्रतापराव पाटील चिखलीकर हे जिल्ह्यात होणाऱ्या बड्या नेत्यांच्या सभा वगळता स्थानिक स्तरावर होणाऱ्या नियोजनात निश्चितच सहभागी राहतील की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये शंकाच आहे. तर भोकर मतदारसंघातील परिस्थिती पाहता माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हेही आपल्या करण्यासाठी भोकर मतदार संघातून जास्त दिवस दूर राहू शकणार नाहीत. त्यामुळे भाजपा नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्य पातळीवरील इतर नेत्यांच्या सभावरच नांदेडमध्ये भाजपा लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असल्याचे दिसत आहे. त्यात भाजपा उमेदवाराचे प्रचाराच्या प्रारंभीपासूनचे एकूणच ‘राग रंग’ पाहता अनेक कार्यकर्ते लांबच राहणे पसंत करीत असल्याची कुजबूज सुरू आहे.