प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, नऊ मतदारसंघात ३ हजार ८८ मतदान केंद्र राहणार 

निवडणूक कामासाठी २१ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण, वेगवेगळ्या कक्षांची स्थापना 

नांदेड – राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा आज होणार, उद्या होणार या चर्चा सुरू आहेत. आता मंगळवारी हरियाणा आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील निवडणुकांच्या घोषणेकडे लक्ष लागणार आहे. त्यात जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीसाठी लागणाऱ्या मतदान यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी २७ ऑगस्ट रोजी पूर्ण झाली आहे. निवडणूक कामासाठी २१ हजार ११५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली आहे. ही नोंदणी अजूनही सुरूच असून निवडणुका घोषित झाल्यानंतर या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. विधानसभेसोबत नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाल्यास त्यासाठीही प्रशासकीय यंत्रणेने पूर्ण सज्जता ठेवली आहे.

जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झाली होती. ही तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीनही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ७ हजार १० बॅलेट युनिट, ३ हजार ९२२ कंट्रोल युनिट आणि ४ हजार २३१ व्हीव्हीपॅट मशीन सज्ज ठेवण्यात आले आहेत. २७ आणि २८ ऑगस्ट रोजी या सर्व यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी समक्ष या ईव्हीएम मशीनची तपासणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात ऑगस्टअखेर २७ लाख ५१ हजार ६३८ एकूण मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १४ लाख १४ हजार ७२७, महिला मतदार  १३ लाख ३६ हजार ७४० आणि तृतीयपंथी मतदारांची संख्या १७१ इतकी आहे. जिल्ह्यात ३ हजार ८८ मतदान केंद्र विधानसभा निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आले आहेत. एका मतदान केंद्रावर साधारणतः चार कर्मचारी राहणार आहेत. त्यासोबतच राखीव कर्मचाऱ्यांची सज्जता ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास २१ हजार ११५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली  निवडणूक उपजिल्हाधिकारी अधिकारी राजकुमार माने यांच्या नियोजनात ही सर्व तयारी केली जात आहे. यासाठी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन काटेकोर नियोजन केले आहे.  अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्याचवेळी जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप कक्षाअंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात वेगवेगळे कक्षही स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षाचे प्रभारी अधिकारीही नियुक्त करण्यात आले असून त्यांना सोपवून दिलेली कामे आणि जबाबदाऱ्याही स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सर्व नोडल अधिकारी आणि त्यांच्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांना एका  आदेशानुसार सूचित करण्यात आले आहे की निवडणूक विषयक आदेश स्वीकारण्याबाबत अनेक ठिकाणी टाळाटाळ होत असल्याचे तसेच कामाकडे दुर्लक्ष करणे, अधिनस्त कर्मचारी यांना निवडणूक कामासाठी कार्यमुक्त न करणे किंवा नोडल अधिकारी यांच्याकडे अधिनस्त कर्मचारी व कर्मचारी यांनी रुजू न होणे या बाबी पुढे येत आहेत. असे प्रकार होत असल्यास त्याची गांभीर्याने नोंद घेतली जाईल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही प्रशासकीय यंत्रणा तयार…

विधानसभेसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक झाल्यास या पोटनिवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीनची सज्जता ठेवण्यात आली आहे. निवडणूक विभागाने लोकसभा पोटनिवडणुकीची तयारीही पूर्ण केली आहे. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २ हजार ८२ मतदान केंद्र राहणार आहेत. त्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ४ हजार १६४ बॅलेट युनिट, ४ हजार १६४ कंट्रोल युनिट आणि ४ हजार १६४ व्हीव्हीपॅट मशीन सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या ईव्हीएम मशीनचीही प्रथमस्तरीय तपासणी जिल्हा निवडणूक विभागाने २८ सप्टेंबर रोजी पूर्ण केली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसोबत नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक घेतल्यास प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे हे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!