क्राईम

अनैतिक संबंधांच्या संशयावरूनच वाका येथील वृद्धाची हत्या; स्थानिक गुन्हा शाखा अन् उस्माननगर पोलिसांनी पकडला आरोपी 

मी काही केले नाही तर ते माझा काटा काढणार..! मारेकऱ्याच्या मनात सतत होती धास्ती

नांदेड – लोहा तालुक्यातील वाका येथे ६७ वर्षीय वृद्धाचा खून अनैतिक संबंधातील संशयावरूनच झाल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. यामध्ये गावातीलच एका ३६ वर्षीय युवकास पोलिसांनी अटक केली असून केवळ ‘मी काही केले नाही, तर ते माझा काटा काढतील’ या भीतीपोटीच मदन अंबादास हंबर्डे या युवकाने किसन हरी खोसे या ६७ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून केला होता.

वाका ते वाका फाटा दरम्यान ४ डिसेंबरच्या सकाळी किसन हरी खोसे वय ६७ वर्ष हे आपल्या शेताकडे जात होते. त्यावेळी त्यांचा धारदार शस्त्राने मानेवर वार करून खून केला होता. या खुनाच्या तपासाचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले होते. यापूर्वी किसन हरी खोसे याच्या मुलाचा अशाच पद्धतीने खून झाला होता. त्यामुळे त्या खुनाशी आणि या घटनेचा काही संबंध आहे का या दृष्टीने पोलिसांनी तपास केला. मात्र मुलाच्या आणि वडिलांच्या खुनाचे धागेद्वारे अद्याप तरी तपासात जुळले नाहीत.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, उस्माननगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सी.पी. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या गुंतागुंतीच्या खुनाचा योग्य दिशेने तपास लावल्याचे स्पष्ट केले. यामध्ये अनेक संशयतांचे जबाब तसेच पोलिसांनी केलेला तपास यातून आरोपीपर्यंत पोहोचता आले असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पोलिसांनी घटनेचे रिक्रिएशन अर्थात पुनरावृत्ती करून खरोखरच आरोपीनेच वृद्धाचा खून केला आहे का?  याचीही पडताळणी केली. स्थानिक गुन्हा शाखेसह नांदेड येथील सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एच. घोगरे, पोलीस उपनिरीक्षक ए. एच. बिचेवार, साईनाथ व्ही. पुयड तसेच पोलीस ठाणे उस्माननगर येथील सहायक पोलीस निरीक्षक सी.पी. पवार यांचे असे एकूण चार पथक या खुनाच्या तपासासाठी तयार करण्यात आले होते. या सर्व पथकांनी वाका गावात आणि परिसरात तळ ठोकून रात्रंदिवस परिश्रम घेत गोपनीय बातमीदार नेमून तसेच गावातील घटनेसंदर्भाने अनेक साक्षीदार यांचे पडताळणी केली. या सर्व तपासात १० डिसेंबर रोजी या तपास पथकाला यश आले आणि सदरचा गुन्हा हा उघडकीस आला आहे.
अबिनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार मदन अंबादास हंबर्डे वय ३६ वर्ष हा सातत्याने किशन हरी खोसे वय ६७ वर्ष यांच्यावर कुटुंबातील व्यक्तीसोबतच्या अनैतिक संबंधाने संशय घेत होता. तसेच या दोघांमध्ये पूर्वीचेही वैमनस्य होते. याच कारणावरून ४ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वाका शिवारात आबाजी गणपत हंबर्डे यांच्या शेतालगत किशन हरी खोसे यांना शेतीकामात वापरण्यात येणाऱ्या कत्तीने हनवटीवर व पाठीमागून मानेवर मारून त्यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या खुनाची कबुलीही आरोपी मदन हंबर्डे याने दिली आहे. प्रकरणाच्या तपासाबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले,  खुनाचा कोणताही स्पष्ट उद्देश दिसत नसतानाही पोलिसांनी शिताफीने हे प्रकरण उघडकीस आणले आहे.
या प्रकरणातील आणखी काही धागेद्वारे उलगडण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. त्याचवेळी अनेक प्रश्न अनुत्तरीतही आहेत. त्या प्रश्नांची उकल ही पोलिसांना करावी लागणार आहे.

मारेकरी मदन हंबर्डे होता विक्षिप्त स्वभावाचा…या प्रकरणातील आरोपी मदन हंबर्डे हा विक्षिप्त  स्वभावाचा असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. तो सगळ्यांमध्ये न मिसळता एकटा राहायचा. शेतामध्ये अथवा दुकानांमध्ये राहायचा, झोपायचा. त्याचवेळी  तो रात्री, अपरात्री कधीही, कुठेही दिसत असे. त्याची झोप ही केवळ दोन ते तीन तासाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. या विक्षिप्त स्वभावातून आपल्याला कोणीतरी काही करेल, आपण काही केले नाही तर ते आपल्याला मारतील याची सतत भीती त्याला राहत होती. त्याचवेळी अनैतिक संबंधातील संशयावरूनही तो कायम किसन खोसे यांच्या मागावर राहायचा. यातूनच संधी साधून ४ डिसेंबर रोजी त्यांचा खून केला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!