
नांदेड – नांदेड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज शुक्रवारी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. २५० इच्छुक उमेदवारांनी या मुलाखती दिल्याची माहिती काँग्रेसचे पक्ष निरीक्षक खा. कल्याण काळे यांनी दिली. काँग्रेसमध्ये राहून जे मध्यरात्री भाजप नेत्यांच्या घरी जाऊन भेटी घेत आहेत, त्यांनी आज आमच्याकडे मुलाखती दिल्या नाहीत असे सांगताना ज्यांनी ज्यांनी काँग्रेस पक्ष सोडला ते आज संपले आहेत, काँग्रेस पक्ष संपला नाही असेही खा. काळे यांनी स्पष्ट केले.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती नवा मोंढा येथील काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात घेण्यात आल्या. काँग्रेसचे नांदेड पक्ष निरीक्षक तथा जालना येथील खासदार कल्याण काळे, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. २० प्रभागात ८१ नगरसेवक पदासाठी २५० इच्छुकांनी मुलाखती दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या मुलाखतीनंतर काँग्रेसचे नेते तथा पक्ष निरीक्षक खा. कल्याण काळे यांच्याशी संवाद साधला असता इच्छुकांची मोठी गर्दी आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसकडे असल्याचे सांगितले. महापालिकेच्या २० प्रभागात ८१ जागांसाठी जवळपास २५० इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखती अतिशय सकारात्मक झाल्याचे ते म्हणाले.
या मुलाखतीनंतर खा. काळे यांच्याशी ‘नांदेड स्क्रिप्ट’ने संवाद साधला असता त्यांनी आगामी काळात काँग्रेस हाच नांदेडमध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसकडून २५० इच्छुक आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे काही पदाधिकारी भाजप नेत्यांच्या आजही संपर्कात असल्याचे विचारले असता, असे भाजप नेत्यांच्या घरी जाणारे कोणीही आज मुलाखतीसाठी आले नसल्याचे खा. काळे यांनी स्पष्ट केले. आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रपणे लढेल असेही काळे यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. स्थानिक पातळीवर नांदेडचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण हे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी महापालिकेत महाविकास आघाडी होईल, असेही ते म्हणाले. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीशीही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी निश्चितपणे आमच्या समवेत असेल असा विश्वास खा. काळे यांनी व्यक्त केला. यावेळी खा. रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर, श्याम दरक, मुन्ना अब्बास, डॉ. करुणा जमदाडे, आनंद चव्हाण, डॉ. रेखा पाटील आदींची उपस्थिती होती.
काँग्रेसमधून अनेक बडे बडे नेते गेले, ते स्वतः संपले पण काँग्रेस संपली नाही..! काँग्रेसमधून अनेक बडे बडे नेते गेले आहेत, ते स्वतः संपले पण काँग्रेस संपली नाही असेही खा. काळे यांनी सांगितले. काँग्रेसमधून अनेक बडे नेते भाजपात प्रवेश करत असल्याबाबत त्यांना विचारले असता खासदार काळे यांनी हे वक्तव्य केले. विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये असताना राज्याचे नेते म्हणून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची ओळख होती. आज त्यांना आगामी नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागणार आहे. नांदेडच्या भाजपा प्रभारी म्हणून पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हीच बाब खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी अधोरेखित केली.



