हवामान

केदारनाथ, बद्रीनाथ दर्शनासाठी उत्तराखंडमध्ये गेलेले नांदेड जिल्ह्यातील ११ युवक अडकले 

सर्व युवक बिलोली तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी, पूर, भूस्खलनाच्या घटनास्थळापासून १५० किलोमीटर अंतरावर सर्वजण सुखरूप

नांदेड – जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील डोणगाव येथून केदारनाथ बद्रीनाथ दर्शनासाठी उत्तराखंडमध्ये गेलेले ११ युवक मंगळवारी उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अडकून पडले आहेत. हे सर्व युवक सुखरूप आणि पूर, भूस्खलन झालेल्या या घटनास्थळापासून १५० किलोमीटर अंतरावर सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून उत्तरकाशी जिल्ह्यात धराली येथे ढगफुटी झाली आहे. त्यामुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला आहे. अनेक ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे घरांचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील डोणगाव येथील ११ युवक केदारनाथ, बद्रीनाथ यात्रेसाठी १ ऑगस्ट रोजी नांदेडहून निघाले होते. त्यांचा संपर्क झाला असून ते सर्वजण उत्तराखंडमध्ये सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार या ११ जणांमध्ये सचिन पत्तेवार वय २५, शिवचंद्र सुकाळे वय ३०, शिवा कुरे वय ३२, स्वप्निल पत्तेवार वय २५, शिवा ढोबळे वय २८, धनंजय ढोबळे वय २६, नागनाथ मुंके वय २८, देवानंद गौण्डगे वय २४, अमोल कुरे वय २८, सोमनाथ चंदापुरे वय २९ आणि देवानंद चंदापुरे वय २७ यांचा समावेश आहे.

उत्तरकाशी येथे घडलेल्या घटनेनंतर अडकलेल्या युवकांना मदत मिळावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे लक्ष ठेवून आहेत. त्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाला आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना  दिल्या आहेत. आणखी काही यात्रेकरू उत्तराखंडमध्ये अडकून पडले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित तालुक्यातील तहसीलदार किंवा जिल्हा आपत्ती जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे ०२४६२ – २३५०७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!