
नांदेड – जिल्ह्यातील वेगवेगळे नेते, १६ तालुके यासह विविध सामाजिक संघटनांचे असलेले अस्तित्व पाहता नांदेड जिल्हा मराठवाड्यात काम करण्यासाठी अतिशय चॅलेंजिंग आणि कामाचे वेगवेगळे अनुभव देणारा जिल्हा आहे. हा जिल्हा प्रॉब्लेमॅटिक नाही. वर्षभराच्या कार्यकाळात नागरिकांशी साधलेल्या संवादातूनच अनेक प्रश्न सोडविता आले, याचा मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी वर्षपूर्तीनिमित्त ‘नांदेड स्क्रिप्ट’ शी बोलताना दिली. विधानसभा आणि लोकसभेच्या दोन निवडणुका वर्षभराच्या कालावधीत पार पाडल्या. निवडणूक कालावधीत आणि निवडणुकीनंतर विरोधकांकडूनही नांदेड जिल्हा पोलीस दलावर पक्षपातीपणे काम केल्याचा आरोप झाला नाही, ही पोलिसांची मोठी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा एक वर्षांचा कार्यकाळ शुक्रवारी पूर्ण झाला. या पार्श्वभूमीवर ‘नांदेड स्क्रिप्ट’ने त्यांच्याशी संवाद साधला. नांदेड जिल्ह्यात जवळपास दोन वर्ष अप्पर पोलीस अधीक्षक पदावर काम करण्याचा अनुभव पाठीशी असतानाही अबिनाश कुमार यांच्याकडे नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार आल्यानंतर ते हा पदभार कसा सांभाळतील याबाबत वेगवेगळ्या चर्चा सामान्य नागरिकांसह पोलीस दलातही सुरू होत्या. ऐन सण उत्सवाच्या काळात अबिनाश कुमार यांनी ८ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला होता. हा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी थेट जनतेशी संवाद साधला. ते थेट लोकांमध्ये पोहोचले. लोकांमध्ये पोहोचल्यानंतर लोकांमधून मिळणारा फीडबॅक हा अतिशय उपयुक्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षभराच्या कालावधीत झालेले अनेक मोठे आंदोलन हे शांततेत पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, हे केवळ नागरिक आणि विविध संघटनांची ठेवलेला संवाद यांच्यामुळेच घडू शकले. नांदेड जिल्ह्यात पोलिसिंग निश्चितच चॅलेंजिंग असली तरीही आगामी काळातही पारदर्शी पोलिसिंग सुरूच राहील, असेही ते म्हणाले.
नांदेड जिल्ह्यात राजकीय नेतेमंडळींशीही काम करताना समन्वय राखता आला आहे. जिल्ह्यात विधानसभा आणि लोकसभेच्या दोन निवडणुका पार पडल्या. या निवडणूक कालावधीत आणि निवडणुकीनंतरही विरोधी पक्षाकडूनही पोलीस दलावर पक्षपातीपणे काम करण्याचे आरोप झाले नाहीत, हे पोलीस यंत्रणेचे यश असल्याचेही अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले. सण उत्सवाच्या कालावधीतही काही घटना घडल्या, मात्र पोलिसांनी वेळीच स्थानिकांशी संवाद साधून त्याचे परिवर्तन मोठ्या घटनेत होऊ दिले नाही. याबाबत त्यांनी तामसा आणि जुन्या नांदेडतील एका घटनेचे उदाहरण दिले.
भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा म्हणजेच १६ तालुक्याचा हा जिल्हा सांभाळताना मानसिकदृष्ट्या आणि प्रशासकीयदृष्ट्याही मोठी तयारी करावी लागते. त्यासाठी सामान्य नागरिक, प्रसार माध्यमे यांची भूमिकाही महत्त्वाची असते, त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहिती आधारे वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल होत असते. त्यामुळे सामान्य नागरिक तसेच माध्यमांशीही सातत्याने संवाद राखण्याचा आपला प्रयत्न राहिला आहे.
जिल्ह्यातील काही मोठ्या गुन्हेगारांचा बिमोड करण्यातही वर्षभरात चांगले यश मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुख्यात गुंड रिंधाची दहशत मोडून काढली आहेच. त्याचवेळी जिल्ह्यातील इतर ४ गॅंगही हद्दपार करण्यात आल्या आहेत. त्या गुन्हेगारी टोळ्या आता हद्दपार झाल्यातच जमा आहेत. टू प्लस अंतर्गत गुन्हेगारांचे सर्व माहिती पोलिसांच्या एका क्लिकवर उपलब्ध आहे. पोलीस दलाने सुरू केलेली सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह अतिशय परिणामकारक ठरले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मोहिमेत लहान मोठ्या कारवाया वाटत असल्या तरीही त्या मोठ्या गुन्ह्यांना होण्यापासून रोखणारी कारवाई आहे. रस्त्यावर दारू पिणाऱ्यांचे प्रमाणही निश्चितपणे शहरामध्ये कमी झाले आहे. आगामी काळातहीही मोहीम प्रभावीपणे राबविली जाईल, असे अबिनाश कुमार म्हणाले. त्याचवेळी शाळा महाविद्यालयामध्ये पोलीस विद्यार्थ्यांमध्येही जनजागृती करत आहेत. कायद्याचे उल्लंघन केल्यास काय दुष्परिणाम होतात याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे. ज्यातून भविष्यात चांगले नागरिक घडतील या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे.
शहरात मेडिसिनचा होणारा गैरवापर ही बाबही प्रामुख्याने पुढे आली आहे. त्यावर पोलीस ठोसपणे कारवाई करत आहेत. १८ कारवाया करण्यात आल्या आहेत. अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. त्याचवेळी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनासोबत केलेल्या संयुक्त कारवाई आतापर्यंत शहरातील १४ औषधी दुकानांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली आहे. नांदेड जिल्ह्यात हेरॉईन, ड्रग्स असे अंमली पदार्थ विक्री होत नसले तरीही गांजा तसेच औषधींचा नशा म्हणून वापर करण्याचे प्रमाण काही प्रमाणात आहे. त्यावरही निश्चितपणे कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यावरही आळा घालण्यासाठी वर्षभरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. आगामी काळातही नांदेड पोलीस दल चांगली कामगिरी करेल तसेच पारदर्शी पोलीसिंग जिल्ह्यात होईल, असा विश्वासही अबिनाश कुमार यांनी व्यक्त केला.
वर्षभरातील कारवाईच्या आकडेवारी संदर्भाने नजर टाकली असता पोलिसांनी वाळू, गुटखा, दारू, जुगार यासह अंमली पदार्थ असा एकूण ४ कोटी २३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे दौरेही शांततेत पार पाडले आहेत.
आजी माजींसह इच्छुकांचीही कुंडली तयार..! नांदेड जिल्ह्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांचा समावेश आहे. या निवडणुका शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस दलाकडूनही तयारी केली जात आहे. आगामी काळातील सण-उत्सवासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पाडणे पोलिसांसाठी आव्हान असले तरीही ते आव्हान निश्चितपणे पोलीस दल पेलणार, असा विश्वासही अबिनाश कुमार यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षभरात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारीही त्याच अनुषंगाने सुरू आहे. जिल्हा पोलीस दलाने आजी माजींसह इच्छुकांचीही सर्व कुंडली तयार केली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व पाळेमुळे हाताशी ठेऊन निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची खबरदारी पोलीस दल घेणार आहे. दुसरीकडे निवडणूक काळात होणारा पैशांचा वापर, वेगवेगळे आरोप याकडे पोलीस दलाचे लक्ष राहील असे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले.



