
नांदेड :- जिल्ह्यात येत्या काही दिवसात गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद व दहीहंडी हे सण एकत्रित येत आहेत. हे सण साजरे करतांना सर्व धर्मियांनी एकमेकात परस्पर सौहार्द व शांतता ठेवून साजरे करावेत. पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनीही पोलीस दलाची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे सांगताना एखादी अप्रिय घटना झाल्यास पोलिसांना वेळ द्यावा, माहिती द्यावी कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल असेही स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे मंगळवारी शांतता समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, भोकरच्या अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, नांदेड तहसीलदार संजय वारकड, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासह शांतता समिती सदस्यांची उपस्थिती होती.
ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी डीजे न लावता सण उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. गणेशोत्सव पर्यावरण पूरक करण्यावर भर द्यावा. नदीच्या वाहत्या प्रवाहात श्री गणेश मुर्तीचे विसर्जन न करता कृत्रिम तलावात करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. यावर्षी कृत्रिम तलावांची संख्या निश्चित वाढवली जाईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. सण उत्सवाच्या काळात नागरिक- मंडळाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून व्हॉटसअपग्रुप तयार करण्यात येणार आहे.
नागरिकांनी कायदा हातात घेवू नये : पोलीस अधीक्षक
श्री गणेशोत्सवासह दहीहंडी ईद-ए-मिलाद या व इतर सण काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस दल सज्ज आहे. नागरिकांनी वेळीच माहिती द्यावी. कोणत्याही नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. उत्सव काळात गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. यासाठी चांगले नियोजन केले असून नागरिकांना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी प्रशानाकडून घेण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.
या बैठकीत शांतता समिती सदस्यांनी प्रशासनाला वेगवेगळ्या सूचना करताना रस्ते, विद्युत व्यवस्था, विसर्जन व्यवस्था आवश्यक ती तयारी वेळीच करण्याच्या सूचना केल्या. त्याचवेळी गतवर्षी झालेले काही प्रकार यावर्षी होऊ नये याबाबतही सूचना केली. यामध्ये तुलजेश यादव, रमेश सोनाळे, भदंत पय्या बोधी, सुधाकर टाक, ॲड. प्रमोद नरवाडे, डॉ. किरण शिल्लेवार, गौतम जैन, बिरबल यादव, डॉ. नरेश रायेवार, अकबर पठाण, माजी नगरसेवक मुंतजीब आदींचा समावेश होता.
महापालिकेच्यावतीने विसर्जनाची तयारी पूर्ण: मनपा आयुक्त गणेशोत्सवाचे सुयोग्य नियोजन महापालिकेच्यावतीने केले आहे. मिरवणूक मार्गात कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घेण्यात येणार आहे. यावर्षी तीन ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गाडेगावचा पर्यायही महापालिका तपासून घेईल. गोदावरी नदीत श्री गणेशाचे विसर्जन होणार नाही याची काळजी गणेश भक्तांनी घ्यावी. गोदावरी नदी शुद्ध ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी केले.



