नांदेड स्क्रिप्ट विशेष

लेंडीचे कार्यकारी अभियंता तिडके अखेर सक्तीच्या रजेवर..!

जलसंपदा विभागाने काढले आदेश, चौगुले यांच्याकडे अतिरिक्त पदभार, तिडकेंवर होता पूरग्रस्तांचा मोठा रोष

नांदेड – लेंडी धरणाच्या बाधित क्षेत्रात पुरामुळे बुडालेल्या गावांमध्ये प्रचंड रोषास बळी पडलेल्या कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांना अखेर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतला असून देगलूरचा हा पदभार आता कार्यकारी अभियंता आशिष चौगुले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. लेंडी धरण क्षेत्रात अचानक निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबतही आता जलसंपदा विभागाकडून चौकशी केली जाणार असल्याचे मुख्य अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी स्पष्ट केले.

मुखेड तालुक्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. मुखेडसह लातूर, कर्नाटक राज्यातील बीदर या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे लेंडी नदीला मोठा पूर आला. लेंडी धरणाच्या झालेल्या घळभरणीमुळे बाधित क्षेत्रातील गावात पाणी शिरले. त्यात भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह इतर काही गावे पाण्याखाली गेली. या पुराचा मोठा फटका प्रामुख्याने हसनाळ आणि रावणगाव या गावांना बसला. हसनाळमध्ये चार महिलांसह एक पुरुष आणि शेकडो जनावरे मृत्युमुखी पडले. रावणगावमध्येही मोठे आर्थिक नुकसान झाले. पुरासंदर्भात यापूर्वी जलसंपदा विभागाने माहिती देताना यंदा धरण फक्त ३० टक्के भरणार असल्याचे बाधित क्षेत्रातील गावकऱ्यांना सांगितले होते. अनेक गावांमध्ये पाणी कुठपर्यंत येईल याची मार्किंगही करण्यात आली होती. त्यामुळे गावकरी निर्धास्त राहिले. रविवारचा काळरात्रीही ते निर्धास्त झोपले होते. मध्यरात्रीनंतर गावात अचानक पाणी शिरल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. गावकरी मिळेल तिथे जीव वाचवण्यासाठी उंच ठिकाणावर धावले. मंदिरात, मस्जिद, उंच ठिकाणावरची वाडे या ठिकाणी थांबून गावकऱ्यांनी जीव वाचवला. ही माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने एसडीआरएफचे पथक तेथे पाठवले. या पथकाकडून तसेच स्थानिक नागरिक, पोलीस दल यांच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू होतेच.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून थेट लष्कराला बचाव कार्यासाठी पाचारण केले. संभाजीनगर येथून एक तुकडी नांदेडात दाखल झाली आणि बचाव कार्याला वेग आला. मात्र या कालावधीत हसनाळ येथे ४ महिला आणि एका पुरुषाला आपला प्राण गमवावा लागला होता. अचानक निर्माण झालेल्या यापूर्वी परिस्थितीमुळे सर्वत्र एकच संताप निर्माण झाला होता. जलसंपदा विभागाने कोणतीही पूर्वसूचना न दिल्यामुळे हा पुराचा फटका बसल्याचा आरोप करण्यात आला स्थानिक आमदारांनाही पूरग्रस्त नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यातही जलसंपदा विभागाचे देगलूरचे कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांच्याबाबत मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये संताप होता. त्यांच्याच कार्यपद्धतीमुळे तसेच नागरिकांना चुकीची माहिती दिल्यामुळे पूर परिस्थिती उद्भवली, असा आरोप केला जात आहे. धरणात ३० टक्के जलसाठा केला जाईल, असे सांगितले असताना ८० टक्क्यांहून अधिक अधिक पाणी धरणात थांबले कसे? त्याचवेळी धरणाचे वेळेवर दरवाजे का उघडण्यात आले नाहीत, असा सवालही आता पुढे येत आहे.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीही या सर्व प्रकाराची चौकशी करून कारवाई केली, जाईल असे स्पष्ट केले होते. अखेर जलसंपदा विभागाने या संदर्भातील आदेश काढताना विवेकानंद तिडके यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. देगलूरचा पदभार आता चौगुले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मुखेडमध्ये लेंडी धरण क्षेत्रात अचानक निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची चौकशी केली जाणार आहे. अतिवृष्टी या भागात झाली पण त्याचवेळी जलसंपदा विभागाकडून काही चुकीचे निर्णय झाले काय..? याबाबतही आता चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत कोणताही हस्तक्षेप होणार नाही या दृष्टीने तिडके यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!