
नांदेड – नवीन नांदेडातील वाजेगाव येथील अंदाजे २० ते २५ वर्षातील युवक बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर तो बुडाल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. त्याचा शोध घेतला असता तो अद्यापही सापडला नाही. महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडूनही त्या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात होता; मात्र अंधारामुळे आता ही मोहीम थांबविण्यात आली आहे. उद्या शनिवारी सकाळीच त्याचा शोध घेतला जाणार आहे.
वाजेगाव येथील एक तरुण जुन्या पुलाच्या पलीकडे असलेल्या बंधाऱ्यावरून गोदावरी नदीत पोहण्यासाठी उतरला होता. पोहोत असताना तो अचानक गायब झाला. त्याचा शोध स्थानिक मासेमारांनी घेतला; मात्र त्याचा शोध लागला नाही. अखेर नांदेड महापालिकेच्या एका माजी स्थायी समिती सभापतीने अग्निशमन दलाला ही माहिती दिली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे प्रमुख केरोजी दासरे यांच्या नेतृत्वाखालील एक टीम तेथे पोहोचली. या टीमने सायंकाळी बोटीच्या सहाय्याने बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू केला: मात्र ही शोध मोहीम अंधारामुळे थांबवावी लागली आहे. तो तरुण अद्यापही बेपत्ताच आहे. उद्या शनिवारी सकाळी लवकर पुन्हा एकदा त्या तरुणाचा शोध घेतला जाणार आहे. गोदावरीचा पूर शुक्रवारी सकाळीच ओसरण्यास प्रारंभ झाला. शुक्रवारी सायंकाळी विष्णूपुरी प्रकल्पाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. पूर काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता पूर ओसरल्यानंतर मात्र हा तरुण बेपत्ता झाला आहे.



