
नांदेड – आज कितीही आधुनिकतेच्या गप्पा होत असल्या तरीही जातीयवादी मानसिकता कायम असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट होत आहे. नांदेडमध्येही आपली मुलगी दलित तरुणाशी विवाह करणार असल्याची माहिती मिळताच त्या संपूर्ण कुटुंबाने युवकाला गोळ्या झाडून, फरशीने डोके फोडून ठार केले. परंतु प्रेम अमर असते हीच भावना मनात ठेवून प्रेयसीने मयत प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न करून आपण आता त्याच्या कुटुंबासोबतच राहणार असल्याचा निर्धार केला आहे. मयत सक्षम आणि आंचलच्या प्रेम कहाणीचा करुण अंत अन् आंचलची झालेली अवस्था पाहून सक्षमच्या अंत्यविधीस उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावले.
‘जात नाही ती जात’ अशी जातीची व्याख्या केली जाते. ही व्याख्या आजच्या एआयच्या काळातही जातीयवाद्यांच्या मनात ठासून भरली आहे. सक्षम गौतम ताटे या तरुणाचे गेल्या काही दिवसापासून आंचल युवतीशी प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधाबाबत मुलीचे वडील तसेच भाऊ यांनी सक्षम गौतम ताटे याला सूचनाही दिली होती. आंचल नाही तू दुसऱ्या कोणालाही बोल मात्र त्या मागासवर्गीय जातीच्या सक्षमला बोलू नको असे सांगितले होते. मात्र हे प्रेमसंबंध थांबत नसल्याने संतापलेल्या गजानन मामीडवार, साहिल गजानन मामीडवार, सोमेश सुभाष लाखे, वेदांत कुंदेकर आणि अन्य चौघांनी गुरुवारी सायंकाळी मिलिंदनगर येथे गाठले. त्याच्याशी वाद घातला त्याच्यावर गोळ्याही झाडल्या आणि शेवटी डोक्यात फरशी घालून त्याचा जागीच खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने तपास करत या घटनेत पाच आरोपींना अटक केली आहे.
शुक्रवारी मयत सक्षम ताटे याचा मृतदेह घरी आणला त्यावेळी त्याची प्रेयसी आंचलही तेथे पोहोचली होती. आंचलच्या भावनाही अनावर झाल्या होत्या. आपल्या प्रियकराला कुटुंबीयांनी ठार केल्यानंतर ती डगमगली नाही. त्याच्या घरी ती पोहोचली. त्यांनी म्हणजे आपल्या कुटुंबीयांनी सक्षमला ठार मारले असले तरी ते हारले, प्रेमात सक्षम जिंकला अशी भावना व्यक्त केली. आम्हाला लग्न करायचे होते, आज सक्षम नसला तरी मी त्याच्या मृतदेहाशी लग्न करून त्याच्याच घरी, त्याच्या कुटुंबीयांसोबत राहील असा निर्धार केला. तसे तिने केलेही. उपस्थितांनी आंचल व सक्षमच्या मृतदेहाला हळद आणि कुंकू लावून लग्न लावले. त्यानंतर सक्षमवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या भावनाशील प्रसंगांमध्ये प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. केवळ जातीय भावनेतून झालेला या प्रेम कहानीचा झालेला हा करुण अंत निश्चितच समाजाला विचार करावयास लावणारा आहे.



