अपघात

नांदेडमध्ये भरधाव वेगातील हायवाने चार वर्षीय बालकाला चिरडले 

नवीन कौठा येथे संत बसवेश्वरांच्या पुतळ्यापुढे झालेल्या अपघातात आजोबा ह गंभीर जखमी, संतप्त नागरिकांचा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात ठिय्या

नांदेड – नातवाला घेऊन रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील हायवा ट्रकने आजोबा आणि नातवाला जबर धडक दिली. यात ४ वर्षीय बालक जागीच ठार झाले तर आजोबा गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नवीन कौठा येथे महात्मा बसवेश्वर पुतळ्याजवळ घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी काहीवेळ रास्ता रोको केला. त्याचवेळी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातही ठिय्या आंदोलन केले. यावेळी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आंदोलन करताना कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलनकर्ते परतले.

नवीन नांदेड येथील राजेश माधव भुतके हे शुक्रवारी सकाळी आठ वाजेदरम्यान आपला ४ वर्षीय नातू प्रणव संपत आचार्य यास घेऊन घरापासून काही अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावर आले होते. ते रस्ता ओलांडत असतानाच अचानक भरधाव वेगातील हायवाने त्या दोघांनाही धडक दिली. या धडकेत चार वर्षीय प्रणवचा जागीच मृत्यू झाला तर राजेश भुतके हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कळताच नवीन कौठ्यातील नागरिक जमा झाले. नागरिकांनी संतप्त हायवा अडवून ठेवला तसेच रास्ता रोको केला. ही बाब पोलिसांना कळताच पोलीस मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांचा या घटनेमुळे संताप अनावर झाला. नागरिकांनी थेट विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला. या भागातून होणारी जड वाहतूक थांबवावी, हायवा वाहतूक थांबवावी, अवैध वाळू वाहतूक थांबवावी, महात्मा बसवेश्वर चौक येथे तिन्ही बाजूने गतिरोधक बसवावेत अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या.

घटनेचे गांभीर्य पाहता अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनीही घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाला त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. तरीही नागरिकांच्या भावना या अनावर होत्या. त्यामुळे काही काळ येथे तणावही निर्माण झाला. रस्त्यावर दगडफेकही करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, बाळासाहेब रोकडे, उपनिरीक्षक संजय केंद्रे, सचिन गढवे यांच्यासह इतर अधिकारी सहकाऱ्यांनी हायवा चालक आणि हायवा ताब्यात घेऊन तात्काळ गुन्हे दाखल केले. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या आरजे 04 जीडी 8751 क्रमांकाच्या हायवा चालक केसाराम थानाराम रा . राजस्थान वय ४० वर्षे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली.

त्याचवेळी नांदेड ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांशी चर्चा करून या ठिकाणी गतिरोधक आणि इतर उपाययोजना करणे किती आवश्यक आहे ही बाब निदर्शनास आणून दिली. कोणत्याही अडचणी आल्यास पोलीस बंदोबस्तात त्या सोडवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या काळात या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी निश्चितपणे उपाययोजना होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच झाला अपघात…मूळच्या लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला प्रणव आचार्य हा आपल्या आजोबांकडे आला होता. विशेष म्हणजे प्रणवचा शनिवारी चौथा वाढदिवस होता. प्रणवचे आजोबा त्याला घेऊन मुख्य रस्त्यावर आले असताना ही दुर्दैवी घटना घडली. वाढदिवसाच्या एक दिवस आधीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक नागरिक, महिला हळहळ व्यक्त करत होत्या. तर तरुण, नागरिक संतप्त झाले होते. महात्मा बसवेश्वर पुतळ्याजवळ अपघात रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे आतापर्यंत येथे दहा ते बारा जणांचा मृत्यू झाला आहे. किरकोळ अपघातही नेहमीच होत आहेत. येथे अपघाताचे सत्र सुरूच असताना याची दखल घेतली गेली नसल्याने नागरिकांनी शुक्रवारी संताप व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!