
नांदेड – नांदेड महापालिकेवर स्थापनेपासून पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाने महापालिका निवडणुकीत पाच माजी महापौरांना रिंगणात उतरविले आहे. हे पाचही महापौर काँग्रेसच्या कार्यकाळात पदावर होते. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ हे सर्व माजी महापौर भाजपात दाखल झाले आणि पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यातील किती माजी महापौरांना नांदेडकर पुन्हा स्वीकारतील याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या स्थापनेपासूनचा इतिहास पाहिला असता भाजपाची आतापर्यंतची सभागृहातील सर्वात मोठी संख्या ही सहा नगरसेवक राहिली आहे. त्यामुळे सत्तेचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात भाजपला किती यश मिळेल हेही १६ जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे.
नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने प्रारंभीपासूनच ‘ एकला चलो’चा नारा लावला आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीतील शिवसेना शिंदे गट या पक्षासोबत चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या; मात्र या फेऱ्या केवळ नाममात्रच होत्या हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. भाजपाकडून उमेदवारीसाठी ८१ जागांसाठी ५२१ उमेदवार इच्छुक होते. इच्छुकांचा हा मोठा आकडा पाहता भाजपाला मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यातूनच महायुतीतील कोणत्याही पक्षाशी युती करायचा नाही हा निर्णय झाला तो अमलातही आला. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पहिल्या दिवसापासूनच आव्हान देत आम्हीही स्वतंत्र लढण्यास तयार असल्याचे सांगितले होते. शिवसेनेचे नांदेडचे नेते हेमंत पाटील यांनीही भाजपाच्या विरुद्ध भूमिका घेतली. पुढे शिवसेनेच्या एका गटासोबत राष्ट्रवादीने दक्षिण नांदेडमध्ये युती केली आहे. तर उत्तर नांदेडमध्ये शिवसेनेचा आमदार बालाजी कल्याणकर यांचा गट स्वतंत्रपणे ३९ जागा लढवत आहे. कल्याणकर यांनीही मोठी ताकद उत्तर नांदेडमध्ये भाजपासह इतर उमेदवारांच्या विरोधात उभी केली आहे. त्यामुळे भाजपला उत्तर नांदेडमधील लढाई म्हणावी तेवढी सोपी राहिली नाही. त्यात भाजपातील अनेक असंतुष्ट उमेदवार, जुने कार्यकर्ते किती प्रमाणात भाजपच्या काँग्रेसी उमेदवारांना सहकार्य करतील, यावरही भाजपाचे यश अपयश अवलंबून राहणार आहे.
नांदेडमध्ये काँग्रेसने नगर परिषदेच्या निवडणुकीतील अपयशानंतर पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडीचा प्रयोग केला आहे. नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस वंचितची आघाडी घोषणेनंतरही तुटली होती. याचा मोठा फटका काँग्रेसला बसला. नांदेड जिल्ह्यात अनेक नगरपरिषदामध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. वंचितचीही १३ नगर परिषदेमध्ये केवळ एक जागा कंधारमध्ये आली. परिणामी नगरपरिषद निवडणुकात झालेली चूक काँग्रेससह वंचितनेही महापालिका निवडणुकीत सुधारत एकमेकांसोबत आघाडी केली. वंचितला २१ जागा देताना स्वतः ६० जागा लढण्याचा निर्णय घेतला. भाजपासारख्या धर्मांध शक्तींच्या विरोधात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्याने नांदेडमध्ये सध्यातरी काँग्रेसची ताकद वाढल्याचेच चित्र आहे. नांदेडमध्ये एमआयएमची पुन्हा एकदा निवडणुकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसला फटका बसावा यासाठीच एमआयएमचा प्रयोग नांदेडमध्ये भाजपाच्या माध्यमातून होत असल्याची टीका विरोधी पक्षातील नेते करत आहेत. ही टीका तथ्यहीन असल्याचे भाजप नेते सांगत असले तर ही सामान्य जनतेला ही विरोधकांची टीका काही अंशी का होईना खरी वाटत आहे त्यामुळे याचा फटका भाजपालाच बसण्याची शक्यताही राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत.
नांदेड महापालिकेच्या या निवडणुकीत शमीम बेगम अ. हाफिज या माजी महापौर ही रिंगणात आहेत. त्या एमआयएमकडून निवडणूक लढवत आहेत. माजी उपमहापौर सतीश पुंडलिकराव देशमुख हे भाजपाकडून विनय विश्वंभर गिरडे हे शिवसेना शिंदे गटाकडून, अब्दुल शमीम हे एमआयएमकडून आणि अब्दुल गफार अब्दुल सत्तार तसेच आनंद शंकराव चव्हाण हे काँग्रेसकडून रिंगणात उतरले आहेत.
महापालिका स्थापनेपासून भाजपने नांदेड महापालिकेत तळाचीच कामगिरी केली आहे. आता तळापासून शिखरापर्यंत जाण्याचे ध्येय भाजपा नेते अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आले आहे. यासाठी भाजपने मोहिनी विजय येवनकर, शीला किशोर भवरे, शैलजा किशोर स्वामी, जयश्री निलेश पावडे आणि बलवंतसिंघ गोविंदसिंघ गाडीवाले या पाच माजी महापौरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपातील केवळ १३ जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे तर उर्वरित सर्व उमेदवार हे काँग्रेस मधून भाजपात आलेले आहेत. इलेक्टिव्ह मेरिटच्या बेस वरच हे उमेदवार निवडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर माजी महापौरांची फौज भाजपाच्या दिमतीला धावली आहे.



