महापालिका

राष्ट्रीय लोकआदालतीमध्ये नांदेड महापालिकेने केली तब्बल ५ कोटी ५८ लाखांची विक्रमी वसुली

नागरिकांचा प्रतिसाद पाहता शास्तीवरील ८० टक्के सूट योजनेस २२ मार्चपर्यंत मुदतवाढ, ३ हजार ७९९ मालमत्ताधारकांनी भरला मालमत्ताकर

नांदेड :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने १४ मार्च रोजी झालेल्या लोक अदालतीमध्ये थकबाकीदारांकडून तब्बल ५ कोटी ५८ लाख रुपये मालमत्ता कराची वसुली करण्यात आली आहे. महापालिकेने लोक आदालतीमध्ये आपल्या थकित कराचा भरणा केल्यास शास्तीवरील रक्कमेत तब्बल ८० टक्के सूट जाहीर केली होती. या योजनेचा लाभ घेत एकूण ३ हजार ७९९ मालमत्ताधारकांनी आपल्या थकित कराचा भरणा करून पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार्य केले आहे.

मालमत्ता कर थकबाकीदारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत तब्बल ३ हजार ७९९ मालमत्ता धारकांनी मोठ्या प्रमाणात कर भरला. लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणांवर तडजोड करून दंड आणि व्याजामध्ये नियमानुसार सवलत देण्यात आली. ज्यामुळे करदात्यांचा कर भरण्याकडे कल वाढल्याचे चित्र आहे. महापालिकेचा महसूल वाढवणे आणि थकित कराची वसुली करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रक्रियेत महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त गिरिश कदम, कर विभागाचे उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे आणि सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली.

महापालिकेत शनिवारी झालेल्या लोकअदालतीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता ८० टक्के शास्ती (दंड) सूट योजनेला २२ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. १४ मार्च रोजी झालेल्या लोक अदालतीमध्ये तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना ऑनलाइन स्वरूपात कर भरण्यास काही प्रमाणात अडचणी निर्माण आल्या असल्याकारणाने त्यांना पुनश्च संधी देण्याच्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे कर भरण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आता ही सवलत योजना २२ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहील. ज्या नागरिकांचा मालमत्ता कर व पाणीपट्टी कर प्रलंबित आहे, त्यांना शास्तीमध्ये ८० टक्केपर्यंत सूट मिळत आहे. नागरिकांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन आपला कर भरून कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!