
नांदेड – नांदेड शहरातील देगलूर नाका भागात नाल्याच्या पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. यात दोन सख्खे भाऊही मृत्युमुखी पडले आहेत. महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन निधीतून नाल्याचे काम सुरू आहे. घटनास्थळापासून हे काम पुढे असल्याचे महापालिका सांगत आहे. त्याचवेळी खाजगी प्लॉटिंग मालकाने मुरूम टाकल्याने त्या नाल्यात पाणी साचले होते अशी माहितीही स्थानिकांकडून देण्यात येत आहे. एका रात्रीत मुरुमाचा हा भराव टाकण्यात आला होता. त्यामुळे नाल्याचे पाणी साचले. त्यातून ही दुर्घटना घडली.
देगलूर नाका भागातील इस्लामपुरा भागातील मोहंमद अली वय १३ वर्ष, मोहंमद फुरखान वय १८ वर्ष, मोहंमद अदनान वय ८ वर्ष आणि मोहंमद रेहान वय ११ वर्ष हे चौघेजण शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. वाटेत हारूनबाग भागात एका मोठ्या खड्ड्यात पाणी साचलेले होते. त्या पाण्यात पोहण्यासाठी ही मुले उतरली. मात्र पाणी खोल होते. मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही. यात चारही मुले बुडाली. फुरखान आणि अदनान हे दोन सख्खे भाऊ आहेत.
या भागात महापालिकेकडून नाल्याचे काम सुरु आहे. बाजुला प्लॉटिंग आहे. हा खड्डा नेमका कोणी खोदला याबाबत अधिकृत माहिती पुढे आली नाही. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेला जबाबदार कोण त्याची चौकशी केली जात आहे. महापालिकेने घटनास्थळापासून नाल्याचे काम पुढे असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी एका रात्रीतूनच खाजगी प्लॉटिंग मालकाने मुरूम टाकल्याने त्या नाल्यात पाणी साचले होते अशी माहितीही पुढे आली आहे. आता या चिमुकल्यांच्या मृत्यूस कारणीभूत कोण आहे हा प्रश्नही विचारला जात आहे.



