
नांदेड – जिल्ह्यात पावसाअभावी जलप्रकल्प कोरडेच असताना नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात मात्र एकाच दिवशी ६० टक्के जलसाठा वाढला आहे. परभणी जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे हा जलसाठा वाढला आहे. विष्णूपुरी प्रकल्पात वाढलेल्या या साठ्यामुळे नांदेडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. महापालिकेलाही पाणीपुरवठा करण्याबाबत चिंता लागली होती. आता ती चिंता ही मिटली असून नांदेडकरांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.
नांदेड जिल्ह्यात आजघडीला सरासरी २६०.८० मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण सरासरीच्या २९.२६ टक्के हा पाऊस आहे. जिल्ह्यात पिकांची परिस्थिती चांगली असली तरीही जलसाठा मात्र चिंताजनक आहे. जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडे आहेत. नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पातही २३ जुलै रोजी १८.४० दलघमी जिवंत पाणीसाठा होता. या पाणीसाठ्याची टक्केवारी २२.७८ इतकी होती. आता गेल्या २४ तासात विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा ८१.७३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला ६८.६९ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. त्यातील जिवंत जलसाठा हा ६६.०३ दलघमी इतका आहे. २४ तासात वाढलेल्या या ६० टक्के जलसाठ्यामुळे नांदेडकरांचा पाणीप्रश्न सुटला आहे. नांदेड शहरातील अनेक भागात जुलैच्या अखेरीसही तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आली होती. आता विष्णुपुरी प्रकल्पात उपलब्ध झालेल्या जलसाठामुळे नांदेडकरांचा पाणी प्रश्न दूर झाला आहे.
चार महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद..! जिल्ह्यातील चार अतिवृष्टी मंडळात गेल्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यातील तीन महसूल मंडळे ही हिमायतनगर तालुक्यातील आहेत. माहूर तालुक्यातील वाई या महसूल मंडळातही ८२.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हिमायतनगर, जवळगाव आणि सरसम या महसूल मंडळात प्रत्येकी ६७.५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात २०.४० मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली असून यात सर्वाधिक ६६.५० मिलिमीटर पाऊस माहूर तालुक्यात नोंदवण्यात आला आहे. हदगाव तालुक्यात ४३.९० मिमी पावसाची नोंद २४ तासात झाली आहे.



