प्रशासकीय

लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता देण्यास राज्य निवडणूक आयोगाने केली मनाई..!

नवीन लाभार्थीही निवडता येणार नाहीत, निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी झाल्या होत्या प्राप्त 

नांदेड – मध्यप्रदेशातील ‘लाडली बहन’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा जानेवारी महिन्याचा अग्रिम हप्ता रोखण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने हे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात अडीच कोटीहून अधिक आणि नांदेड जिल्ह्यातही नऊ लाखाहून अधिक लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना नियमित लाभ देता येईल, परंतु अग्रीम स्वरूपात लाभ देता येणार नाही असेही आयोगाने या आदेशात स्पष्ट केले आहे.
सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही योजना आमचीच आहे, असे सांगत मतदारांना आम्हालाच मतदान करावे असे आवाहन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट १४ जानेवारी रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये जमा करण्याचे आश्वासनही दिले होते. त्याचवेळी १४ जानेवारी हा दिवस डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता टाकण्यासाठी निश्चित करण्यात आला होता. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी विशेष भेट म्हणून राज्य शासनाने ही घोषणा केली होती; मात्र राज्यात महापालिका निवडणुकांची आचारसंहिता सुरू असताना अशा स्वरूपात शासकीय योजनांचा लाभ देणे कितपत योग्य आहे, अशा तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या होत्या. त्या संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे असे राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना कळवले होते.

राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशातील तरतुदीनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेले विकास कामे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे, असे मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात कळवले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता या योजनेचा नियमित लाभ देता येईल, परंतु अग्रीम स्वरूपात लाभ देता येणार नाही तसेच नवीन लाभार्थीदेखील निवडता येणार नाहीत, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबर २०२५ चा हप्ता प्राप्त होईल; मात्र जानेवारी २०२६ चा हप्ता देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे मिळणारा आता डिसेंबर २०२५ या एकाच महिन्याचा राहील हे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाला होता मोठा फायदामहाराष्ट्रात २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा मोठा लाभ झाला होता. अपेक्षेपेक्षाही कितीतरी प्रमाणात अधिक यश महायुतीला प्राप्त झाले महायुतीची एक हाती सत्ता राज्यात स्थापन झाली. या योजनेच्या बळावरच महापालिका निवडणुकाही जिंकण्याचे प्रयत्न महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाकडून केले जात आहे. ही योजना आम्हीच आणली असा दावा हे तीनही पक्ष करत आहेत. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा महायुतीतील पक्षाकडून ठेवण्यात आला आहे. विधानसभेतील यश पाहता महापालिकेतही या योजनेच्या बळावरच यशाची अपेक्षा महायुतीतील पक्षांना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!