
नांदेड – जिल्ह्यातील सर्व व्हॉट्स ॲप ग्रुप ॲडमिन, सभासद तसेच समाजमाध्यमांचा अर्थात सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्यांना नांदेड पोलिसांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीसाठी खबरदार करताना आचारसंहिता काळात कोणतेही आक्षेपार्ह संदेश, टिकाटिपण्णी, दोन समाजात तेढ निर्माण होणारे संदेश पसरविल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
नांदेड पोलीस विभागाकडून याबाबत आवाहन करण्यात आले आहे. आपल्या गावात, शहरात सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहात. विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ चे अनुषंगाने संपूर्ण राज्यात दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. नांदेड जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्हास्थळ सिमेच्या हद्दीमध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम अन्वये ३७ (१) (३) चे प्रतिबंधक आदेश तसेच भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ अन्वये निर्बंध घालण्यात आले आहेत.
त्यामुळे विधानसभा निवडणुका आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मतदान प्रक्रिया व प्रचारादरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतेही गैरकृत्य, सामाजिक अशांतता निर्माण होणारे संदेश पसरविले जाऊ नये यासाठी विविध सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये
कोणत्याही उमेदवाराशी संबंधित त्याचे वैयक्तीक, कौटुंबिक अगर सामजिक स्तरावर अवहेलना होईल असे आक्षेपार्ह टिकाटिपण्णी करणे, मजकुर, फोटो, व्हिडीओ, (एडिट मार्किंग) करून प्रसारीत करणे अथवा आलेल्या संदेशावर आपले आक्षेपार्ह मत प्रकट करणे व पुढे पाठविणे. मतदाराचे मन वळविण्यासाठी कोणत्याही धर्माच्या लोकांच्या धार्मिक भाषिक तसेच जातीत व्देष पसरविणारे आक्षेपार्ह मजकूर फोटो, व्हिडीओ, (एडिट मार्किंग) करून प्रसारीत करणे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचे स्वतंत्र सोशल मिडीया ग्रुप तयार करून त्याव्दारे आक्षेपार्ह मजकूर फोटा, व्हिडीओ, (एडिट मार्किंग) करून प्रसारीत करणे अथवा कृत्य करणे. कुठल्याही व्हॉटसअप ग्रुपमध्ये आचारसंहितेचा भंग होईल अथवा दोन गटात वाद होईल अशी पोस्ट अथवा मजकूर फोटो, व्हिडीओ टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीसह ग्रुप ॲडमिन जबाबदार असणार आहे.
या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. आदर्श आचारसंहिता भंग झाल्यास संबंधित व्यक्तीसह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरण्यात येऊन आपल्याविरूध्द कडक कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.