
नांदेड – अर्धापूर तालुक्यातील लहान गावात होत असलेल्या अवैध दारू विक्रीची बातमी टाकल्याच्या रागातून चक्क पत्रकाराचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अर्धापूर तालुक्यात आंबेगाव येथे घडली. यावेळी पत्रकाराची पत्नी खंबीरपणे उभी राहिल्याने आणि वेळीच ग्रामस्थ धावल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला. ही सर्व घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे.
दहा वर्षापासून पत्रकारितेत असलेले रामचंद्र उर्फ मनोज माणिकराव मन्नपूर्वे रा. आंबेगाव हे दैनिक श्रमिक लोकराज्य या वृत्तपत्राचे प्रतिनिधी आणि यु ट्यूबसाठी पत्रकारिता करतात. २५ मार्च रोजी त्यांनी दैनिक श्रमिक लोकराज्य वृत्तपत्रांमध्ये ‘लहानमध्ये भोंगा डीजे बंदीचा धाडसी निर्णय पण अवैध दारूवर गावकऱ्यांचा रोष’ या मथळ्याखाली बातमी दिली. या बातमीचे अनेकांनी स्वागतही केले; मात्र अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे पित्त खवळले. मनोज हे २६ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आंबेगाव येथे घरी असताना अनिल सावंत रा. लहान यांनी फोन करून बाहेर रोडवर या असे सांगितले. ते गावातील पोलीस पाटील यांच्या पानपट्टीजवळ थांबले. त्यावेळी अचानक दोन मोटरसायकलवर संतोष बोले आणि अनोळखी चार साथीदार सर्व रा.लहान हे तेथे आले. त्यापैकी संतोषने ‘तू आमच्या गावातील बातमी पेपरला का दिलास, तू तुझ्या गावाचे काम कर असे म्हणाला. यावेळी त्यांनी मनोजला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी यावेळी मनोजच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. हा सर्व गोंधळ सुरू असताना मनोजची पत्नी, आई-वडील भाऊ आणि गावातील लोक हे सर्व रस्त्यावर आले. त्यांनी मनोजला संतोष बोले व त्याच्या साथीदारापासून सोडविले. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात संतोष बोले आणि दुचाकीवर आलेले चौघेजण अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्धापूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत शुक्रवारी सकाळीच दोन आरोपी पकडले. इतर आरोपीही ताब्यात घेतले आहेत. या याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायदा, अपहरण आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अर्धापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्याकडे सोपविला आहे.
गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकारांचा पाठपुरावा… अर्धापूर तालुक्यात घडलेल्या या घटनेची माहिती नांदेड येथील पत्रकारांना कळाली. त्यामुळे या घटनेत पत्रकार संरक्षण कायद्यान्वयेच गुन्हा दाखल केला जावा, आरोपीविरुद्ध कडक कारवाई करावी यासाठी अर्धापूर पोलीस ठाण्यात जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया संघाचे जिल्हाध्यक्ष शेख मुजीब, वरिष्ठ पत्रकार सतीश मोहिते, कमलाकर बिरादार, संजय सूर्यवंशी यांनी धाव घेतली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्याशी चर्चा केली. मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे, कार्याध्यक्ष अनिल कसबे, सचिव अनुराग पोवळे, नांदेड महानगर अध्यक्ष रवींद्र संगनवार यांनीही या प्रकरणात कठोर कारवाईसाठी आग्रही भूमिका घेतली. पत्रकारांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे.



