
नांदेड – जिल्ह्यात ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांच्या जिल्हा पोलिसांनी चार दिवसात मुसक्या आवळल्या आहेत. आठ वाहनांसह ४० ब्रास रेतीही जप्त केली आहे. एकूण १ कोटी ४७ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचवेळी कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी मात्र वाळू वाहतूकदारांकडून लाच घेताना रंगेहात ठाण्यामध्येच पकडले आहेत. त्यामुळे वाळू माफिया विरुद्ध पोलीस असा हा सामना जिल्ह्यात रंगत असल्याचे स्पष्ट होत आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या व्यक्ती आणि वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने २१ जानेवारी ते २४ जानेवारी या चार दिवसांच्या कालावधीत पोलीस ठाणे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे रॉयल्टी न भरता विनापरवाना बेकायदेशीररित्या हायवा ट्रक आणि आयचर या वाहनांमध्ये रेती भरून शासनाचा कोणत्याही प्रकारचा महसूल न भरता रेतीची चोरटी वाहतूक जिल्ह्यात केली जात होती. त्यावेळी २१ जानेवारी रोजी मुखेड पोलिसांनी चार ब्रास वाळू आणि एक वाहन जप्त करून दोघाविरुद्ध कारवाई केली. २३ जानेवारी रोजी उस्माननगर पोलिसांनी सहा ब्रास वाळू जप्त केली आहे. तर एक वाहनही पकडले. भाग्यनगर पोलिसांनी २४ जानेवारी रोजी दहा ब्रास वाळू पकडत चौघाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तर सोनखेड पोलिसांनी २४ जानेवारी रोजी ४ हायवा ट्रक पकडून वीस ब्रास वाळू जप्त केली आहे.
या चार दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या असल्या तरीही वाळू वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी लाच घेणारे कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे आणि उपनिरीक्षक नारायण शिंदे हे दोन अधिकारी याच कालावधीत २३ जानेवारी रोजी गजाआड गेले आहेत हेही महत्त्वाचे.. ठाणे हद्दीतून होणाऱ्या वाळू वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १७ हजार रुपयांची ठाण्यातच लाच घेणारे कुंडलवाडी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत तुकाराम नागरगोजे आणि उपनिरीक्षक नारायण मारोतराव शिंदे या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांची एक हायवा ट्रक असून ते या वाहनाने कायदेशीर परवानगी असलेल्या वाळूच्या ठेक्यावरून ऑर्डर मिळाल्याप्रमाणे वाळू वाहतूक करीत होते. त्यांची वाळू वाहतुकीचा हायवा ट्रक पोलीस स्टेशन कुंडलवाडी हद्दीतून वाहतूक करताना त्यावर पोलिसांनी कोणतेही कारवाई करू नये या करिता २५ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती सहायक पोलीस निरीक्षक नागरगोजे यांना १० हजार तर उपनिरीक्षक शिंदे यांना ७ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार कुंडलवाडी ठाण्यातच १७ हजार रुपयांची लाच घेताना सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांना पकडले. त्यांच्याविरुद्ध कुंडलवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.