अपघात

किनवट तालुक्यात अस्वलाचा हल्ला; एक शेतकरी ठार, ८ जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

जखमींवर नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू, वाशिम येथील विशेष पथकाला पाचारण, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारीही तळ ठोकून

किनवट- किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा येथे १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री चिडलेल्या एका अस्वलाने केलेल्या भीषण हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने अस्वलाला पकडण्यासाठी विशेष पथकासह शोध मोहिम सुरू केली आहे
दयाळ धानोरा येथील दत्ता बळीराम जाधव (वय ५५) हे मंगळवारी रात्री मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले. पिकाला पाणी देत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर झडप घालून हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्याच्या वेळी ते ओरडल्याने मदतीला धावलेल्या इतर शेतकऱ्यांवरही अस्वलाने हल्ला चढवला. यात रमेश बळीराम जाधव (४५), शंकर तानाजी जाधव (५०), सुदर्शन दत्ता पवार (३५), चंद्रसिंग शेषराव राठोड (३०) हे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. रमेश जाधव, शंकर जाधव, सुदर्शन पवार या तिघांवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या चंद्रसिंग राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना  उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. तसेच पंडित जयसिंग जाधव (२२), विनोद शेषराव राठोड (३४), अरविंद शेषराव जाधव (३५) व संजय दत्ता जाधव (३०) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर शिवणी येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात उपचार करण्यात आले.
गंभीर जखमी रमेश जाधव यांना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले होते. बुधवारी पहाटे या घटनेची माहिती मिळताच इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, वन विकास महामंडळाचे अधिकारी चोले तसेच स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार, प्रकाश जाधव, जेसीबी मालक संजय तोटावाड, चालक मोसम भाई व ग्रामस्थांनी मदतकार्य केले.उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक, इस्लापूर व बोधडी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वन कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

…तर टळला असता हल्ला..?दोन दिवसांपूर्वी याच परिसरात अस्वलाचे पिल्लू मृतावस्थेत आढळले होते. वनविभागाने त्या प्रेताची विल्हेवाट लावली होती. त्यानंतर योग्यप्रकारे जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असत्या तर ही घटना टळली असती, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या गंभीर घटनेनंतर वाशिम येथून विशेष पथक पाचारण करण्यात आले असून, परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. राज्यात वन्यप्राण्याकडून एकाच वेळी इतक्या व्यक्तींवर झालेला हा हल्ला ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. या घटनेमुळे दयाळ धानोरा व परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे सावट कायम आहे. शासनाने तातडीने नुकसानभरपाई व ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!