
नांदेड – परवानगी पेक्षा कितीतरी पटीने वाळू साठा केल्यानंतर आता देगलूर आणि बिलोली तालुक्यातील वाळू ठेकेदार नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून विक्री करीत आहेत वाळू वाहतुकीच्या या स्पर्धेत रविवारी दोन तरुणांचा बळी गेला आहे. सगरोळी बसस्थानकाजवळ सकाळी दहाच्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या एका हायवाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघेही तरुण जागीच ठार झाले आहेत.
सगरोळी बसस्थानकाजवळ वाळू वाहतूक करणाऱ्या एमएच ०४ एफजे ९७०९ या क्रमांकाच्या वाहनाने टी. एस. १४ एवाय ८६७८ क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील दोन्ही तरुण जागीच ठार झाले. यामध्ये मोईन वजीरसाब शेख वय ३६ रा. हिप्परगा आणि नवीन संग्राम पवार वय २५ रा. सगरोळी या दोघांचा मयतामध्ये समावेश आहे. यातील एका तरुणाचा विवाह झाला होता. तर एक अद्यापही अविवाहितच होता.
बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे प्रशासकीय मान्यता मिळालेले दोन वाळू डेपो आहेत. या दोन्हीही वाळू डेपोतून मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वाळूची वाहतूक सुरू आहे. बनावट पावत्या तयार करून तसेच बनावट लाभार्थ्यांच्या नावे पावत्या तयार करून मोठ्या प्रमाणात लाल वाळू कर्नाटका आणि तेलंगणात विक्री केली जात आहे. वाळूचा उपसा आणि वाहतूक सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेतच करणे बंधनकारक असले तरीही या नियमांचे एकाही ठेकेदाराकडून पालन केले जात नाही. याकडे महसूल विभाग, पोलीस ठाणे, प्रादेशिक परिवहन यंत्रणाही या सर्व बाबीकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करत आहे हे स्पष्ट झाले आहे.
प्रशासकीय मान्यतेपेक्षा अधिकच्या वाळू साठ्याची मोजणी होणार का..? प्रशासकीय मान्यतेपेक्षा हजारो पटीने अधिक वाळू उपसा करून तो विक्री केला जात आहे. ही बाब नांदेड स्क्रिप्टच्या माध्यमातून २४ तासापूर्वीच उघड करण्यात आली होती. आता आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने अधिकृत डेपोमध्येही अनधिकृत वाळूचा साठा हा एकूण प्रशासकीय मान्यतेपेक्षाही अधिकचा साठा केला जात असल्याची बाब सामान्यांच्या नजरेत येत असताना, सामान्यांना एका नजरेत कळत असताना प्रशासकीय अधिकारी मात्र या साठ्यांची मोजदाद का करत नसावेत हाच प्रश्न आता पुढे आला आहे. या अवैध वाळू वाहतुकीतून आणखी किती बळी घेतले जातील, याची चिंता आता गावकऱ्यांना लागली आहे.