
नांदेड – नांदेड लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा ४ जून रोजी २५ ते २६ मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये पुढे येणार आहे. या मतमोजणीसाठी २ हजार अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघात ६०.९४ टक्के मतदान झाले आहे. नांदेड मतदारसंघातील ११ लाख २८ हजार ५६४ मतदार नांदेडचा खासदार ठरवणार आहेत. तो कोण असेल हे दोन दिवसात स्पष्ट होईल.
नांदेड लोकसभेसाठी एकूण २३ उमेदवारांनी रिंगणात उडी घेतली होती. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, काँग्रेसचे वसंतराव चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर यांच्यासह इतर उमेदवारांचा समावेश होता. त्यात निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाची नांदेडमधील स्थिती मजबूत झाली. २०१९ च्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा एकत्रितरित्या प्रचार केला. त्यामुळे या जोडगोळीचा किती परिणाम मतदारांवर झाला हे ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे. त्याचवेळी काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांना मैदानात उतरविण्यात आले. काँग्रेसच्या पडत्या काळात मैदानात उतरलेल्या वसंतराव चव्हाण यांनी विजयाचा विश्वास थेट पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनाही आपल्याला चांगली मते मिळतील, आपण विजयी होऊ असा विश्वास आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत नांदेड मतदारसंघात मतदान केलेल्या ११ लाख २८ हजार ५६४ मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला आहे हे चार जून रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.नांदेड लोकसभेसाठी जिल्ह्यातील २ हजार ६२ मतदान केंद्रावर शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले होते.
जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६५.६७ टक्के मतदान झाले झाले होते. या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा प्रभाव निवडणूक प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात दिसून आला. भोकर मतदारसंघातील नेत्यांना प्रचारासाठी गावागावात येऊ दिले नव्हते. अनेक ठिकाणी विरोधात घोषणाबाजी करून त्यांना माघारी फिरण्यास भाग पाडले होते. त्या खालोखाल नायगाव विधानसभा मतदारसंघात ६५.३२ टक्के मतदान झाले आहे. काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे नायगाव येथीलच आहेत. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात किती मते मिळतील याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे. प्रचारदरम्यान वसंतराव चव्हाण यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता, याची आठवणही विरोधकांनी त्यांना वारंवार करून दिली होती. त्यामुळे हा मतदारसंघही निकालाच्या दृष्टीने लक्षवेधी ठरणार आहे. नांदेड दक्षिणमध्ये ६०.२८ टक्के मतदान झाले तर नांदेड उत्तरमध्ये ५८.५३ टक्के एकूण मतदान झाले. जिल्हा मुख्यालयाचे हे दोन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना किती अनुकूल ठरतील हेही मतमोजणीच्या पेट्या उघडल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. देगलूर विधानसभा मतदारसंघात ५९.८२ टक्के मतदान झाले. हे मतदान दोन्ही प्रमुख पक्षाने आमच्या बाजूने झाल्याचा दावा केला आहे. तो दावाही किती खरा हे स्पष्ट होणार आहे. त्यात काँग्रेसचे आमदार जितेंद्र अंतापुरकर हे प्रचारापासून दूरच राहिले होते. त्यांच्यावर कारवाई होईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारादरम्यान दिली होती. मात्र त्यांना आता काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी समितीत समाविष्ट केले आहे. त्यामुळे कारवाईचा विषय बाजूला पडला हेच स्पष्ट होत आहे. तर मुखेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील यांचा किती प्रभाव उरला आहे, याची चाचपणी करणारा हा निकाल ठरणार आहे. मुखेड मतदार संघात ५६.७६ टक्के मतदान झाले होते.
नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेल्या एकूण ११ लाख २८ हजार ५६४ मतदानापैकी महिलांचे एकूण मतदान ५ लाख २२ हजार ६२ इतके तर पुरुषांचे ६ लाख ६ हजार ६८२ मतदान झाले होते. तृतीयपंथीयांचे एकूण २० मते या निवडणुकीत पडली. नांदेड जिल्ह्यात एकूण मतदार १८ लाख ५१ हजार ८८३ होते. त्यामध्ये पुरुष मतदार संख्या ९ लाख ५५ हजार ८४ तर महिला मतदारांची संख्या ८ लाख ९६ हजार ६१७ इतकी होती. तृतीयपंथी मतदार १४२ होते
आठ दिवसापासून सुरू आहे मतमोजणीची रंगीत तालीम…नांदेड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने गेल्या आठ दिवसापासून तयारी सुरू केली आहे. तांत्रिकदृष्ट्या वेगवेगळ्या बाबी तपासून पाहणे, सुरक्षा विषयक बाबींची चाचपणी या सर्व प्रशासकीय घडामोडी गेल्या आठ दिवसापासून वेगवानरित्या पार पडत आहेत. आता ही तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जवळपास २ हजार अधिकारी कर्मचारी मतमोजणीच्या कामात नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल मतमोजणीसाठी ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक आणि एक मायक्रो ऑब्जर्व्हर राहणार आहे. त्याचवेळी उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी या मतमोजणीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार आहेत. ४ जून रोजी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यात पोस्टल मतदानाची संख्या ५ हजार २१२ इतकी झाली आहे. यामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरीच मतदान नोंदवण्याची संधी निवडणूक आयोगाने दिली होती. या पोस्टल मतमोजणीनेच मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.