
रवी देशमुख
भोकर – शहरात सलग दोन दिवसापासून अपघाताची मालिका सुरू झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी उमरी बायपास येथे हायवा ट्रकच्या धडकेत दोन युवक ठार झाले तर दुसरी घटना शनिवारी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान घडली. शहरातील एका हाँटेलमध्ये काम करणारा कामगार सुट्टी झाल्याने सायंकाळी सातच्या सुमारास घराकडे उड्डाणपुलावरुन पायी चालत जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने सदरील कामगारांचा जागीच मृत्यू झाला.
भोकर शहरातून मोटारसायकल क्रमांक एम.एच.२६ सी.एल.३५४९ ही मोटार सायकल नांदेडकडे जात होती. चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे मोटारसायकल चालवत नागोराव धोंडीबा सुर्यवंशी वय ५८ वर्षे रा. महात्मा फुलेनगर, भोकर यांना जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदरील घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार नामदेव राठोड व पोलीस कर्मचारी चंद्रकांत आरकीलवार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत होते.