
नांदेड – शहराजवळील पावडेवाडी शिवारात ४६ वर्षांपूर्वी १९७८ मध्ये बनवलेल्या बंदुकीच्या गोळ्या आढळल्या आहेत. या गोळ्या गंजून जीर्ण होऊन निकामी झालेल्या आहेत. या गोळ्या सापडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथक, श्वान पथक यासह पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहोचले. या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक जूनच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन भाग्यनगरच्या गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक विनोद देशमुख, पोहेकॉ गजानन किडे, प्रदीप गर्दनमारे, कळके, ओमप्रकाश कवडे, हनुमंता कदम आदी पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली. पावडेवाडी शिवारात राहणारा आकाश रामराव पावडे हा युवक शिवारातील नाल्यामध्ये झाडाझुडपांमध्ये मध काढण्यासाठी गेला असता त्याला नाल्यामध्ये बंदुकीच्या गोळ्या (काडतूस) दिसून आल्या. याबाबतची माहिती प्राप्त होताच पोलीस भाग्यनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे आणि गुन्हे शोध पथकातील अधिकारी यांनी आकाश पावडेसह जाऊन जागेची पाहणी केली. त्यावेळी पावडेवाडी शिवारातील नाल्यांमध्ये ४३६ बंदुकीच्या गोळ्या ( राऊंड) मातीमध्ये अर्धवट उघडे पडलेल्या दिसून आल्या. त्या गोळ्या गंजून जीर्ण झालेल्या अवस्थेत आहेत. सदर बंदुकीच्या गोळ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. या राऊंडवर पाठीमागील फायर कॅपवर 7.62 OFV-78- M- 80 असे कोरीव लिहिलेले आहे. याबाबत पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार शाखेतील अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली सदरील बंदुकीच्या गोळ्या( राऊंड्स ) हे १९७८ मध्ये ४६ वर्षांपूर्वी बनवलेल्या आहेत. त्या गंजून जीर्ण होऊन निकामी झालेल्या आहेत असे प्रथमदर्शने स्पष्ट झाले आहे.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, सहाय्यक पोलीस अधीक्षक सी.एम. कीरितिका, पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, दहशतवाद विरोधी पथक, डॉग स्कॉड, बीडीएस पथक यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी भाग्यनगर पोलीस ठाण्यामार्फत केली जात आहे.