
नांदेड – मुखेड तालुक्यात रविवारी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. तालुक्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे बचाव कार्यासाठी एसडीआरएफचे एक पथक दाखल झाले आहे. तालुक्यात निर्माण झाल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्यासह तहसीलदार राजेश जाधव हे मध्यरात्रीपासून रस्त्यावर आहेत. पोलीस विभागाचे जलद प्रतिसाद पथकही मुखेड तालुक्याचे पूरग्रस्तांच्या बचावासाठी पुढे सरसावले आहे.
मुखेड तालुक्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. लेंडी नदीला मोठा पूर आला असून अनेक नदी नाले ही वाहत आहेत आणि गावात पाणी शिरले असून भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह इतर काही गावे पाण्याखाली गेली आहेत. काही गावांतील घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांना रात्रभर घराबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले. शाळा, मंदिरे व उंच ठिकाणी नागरिकांनी आश्रय घेत जीव वाचवला.
पुरामुळे हाताशी आलेले पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. पावसाच्या पाण्याने शेतकऱ्यांची शेतीच नव्हे तर साठवलेले धान्य, संसारोपयोगी साहित्य व जनावरांचे खाद्यही नष्ट केले आहे.शेतकऱ्यांचे तब्बल १०० टक्के नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. तालुक्यातील पूरस्थितीवर आ. डॉ. तुषार राठोड यांनी आढावा घेत प्रशासनाला मदतकार्य गतीमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील व तहसीलदार राजेश जाधव यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाचा जोर वाढला असतानाच पूर परिस्थिती निर्माण होईल ही बाब लक्षात घेऊन विभागीय अधिकारी अनुप पाटील आणि तहसीलदार राजेश जाधव हे मध्यरात्रीपासूनच गावागावांना भेटी देऊन पाहणी करत आहेत. बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी एसडीआरएफची टीम मुखेड तालुक्यात दाखल झाली असून मदतकार्य सुरू आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून पोलीस दलाचे जलद प्रतिसाद पथकही मैदानात उतरले आहे.



