महापालिका

नांदेडमध्ये अनधिकृत बॅनरप्रकरणी बघ्याची भूमिका घेणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आयुक्तांनी ठोठावला दंड..!

भाजपा राज्य पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी शहरभर झळकले होते अनधिकृत बॅनर

नांदेड – शहरात लागणाऱ्या अनधिकृत बॅनरवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रयत्नांना क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडूनच खो मिळत असल्याची बाब मंगळवारी पुन्हा एकदा पुढे आली. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर लावलेल्या अनधिकृत बॅनरमुळे आयुक्तांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना फैलावर घेत आपण काय झोपा काढत आहात का..? अशी विचारणा केली. त्याचवेळी या क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली आहे.

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांचा २४ डिसेंबर हा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरात सर्वत्र शुभेच्छांचे बॅनर झळकत होते. मात्र हे बॅनर लावताना महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. याबाबत महापालिका आयुक्तांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारीनंतर महापालिका आयुक्तांनी सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना तातडीने पचारण करत या अनधिकृत बॅनरबाबत विचारणा केली. त्यावेळी एकाही क्षेत्रिय अधिकाऱ्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्याचवेळी एकाही क्षेत्रिय अधिकाऱ्याने या अनधिकृत बॅनर लावणाऱ्याविरुद्ध कारवाई केली नव्हती. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात लागलेल्या या बॅनरबाबत आपण बोटचेपी भूमिका का घेत आहात..? असा सवालही आयुक्तांनी उपस्थित केला. मात्र त्याचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे शिवाजीनगर, वजीराबाद, तरोडा आणि इतवारा क्षेत्रिय अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी आपल्या प्रारंभीच्या काळात शहरातील अनधिकृत बॅनरला मोठ्या प्रमाणात आळा घातला होता. अनधिकृत बॅनर लावणाऱ्याविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले होते. मात्र पुढे राजकीय प्रभावाखाली ही अनधिकृत बॅनर विरुद्धची मोहीम काही अंशी गुंडाळण्यातच आली. त्यातच पुढे निवडणुकाही आल्या. त्या निवडणुकांचा निकाल आल्यानंतरही मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झाली. ही बॅनरबाजीही अनधिकृतरित्याच करण्यात आली होती. या अनधिकृत बॅनरवर आळा घालण्यात महापालिका प्रशासन निश्चितच अपयशी ठरले होते. त्यातच २४ डिसेंबर रोजी महापालिका हद्दीत भाजपा नेते अमरनाथ राजुरकर यांच्या वाढदिवसाचे अनेक शुभेच्छा फलक अनधिकृतपणे शहरात झळकले. त्यामुळे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी कारवाईचा बडगा थेट क्षेत्रिय अधिकाऱ्यांवरच उगारला. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ठराविक दंड भरण्यास सांगण्यात आले आहे. त्याचवेळी शहरात बॅनर फलक लावण्याची जागा सुचविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मात्र यापूर्वीच्या निश्चित केलेल्या जागावर ठराविक रक्कम भरून बॅनर लावणे आवश्यक असताना अशा जागाही मोठ्या प्रमाणात खाजगी कोचिंग क्लासेस, रुग्णालय, राजकीय नेते बळकावत आहेत. त्यामुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्याचवेळी शहराचे मोठे विद्रूपीकरण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रकारावर आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या कठोर भूमिकेला आता क्षेत्रिय अधिकारी या पुढील काळात कसा प्रतिसाद देतील, हे लवकरच स्पष्ट होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!