राजकीय

नांदेडमध्ये भाजपाच्या बैठकीत पुन्हा एकदा राडा..!

नांदेड उत्तरचे पदाधिकारी धावले एकमेकांच्या अंगावर

नांदेड – लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नांदेडमध्ये पराभवाचे तोंड पहावे लागले. या पराभवानंतर भारतीय जनता पक्षात सर्वकाही अलबेल आहे असे नाही. लोकसभेतील पराभवानंतर प्रत्येक बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडे होत आहेत. बुधवारी झालेल्या उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही नांदेड उत्तरचे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकरांच्या ‘उदो उदो’नंतर भाजपा पदाधिकारी एकमेकांच्या थेट अंगावर धावून गेले.

बुधवारी सायंकाळी नांदेड येथे शासकीय विश्रामगृहात नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख मिलिंद देशमुख, प्रवीण साले, विजय गंभीरे आदींच्या उपस्थितीत घेण्यात आली. महायुतीमध्ये नांदेड उत्तरची जागा भाजपाला सोडवून घ्यावी अशी मागणी बहुतांश पदाधिकाऱ्यांनी केली. या जागेसाठी भाजपाकडून मिलिंद देशमुख यांच्या नावाची शिफारसही पदाधिकारी करीत होते. यावेळी बालाजी सूर्यवंशी यांनी मात्र नांदेड उत्तर मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर चांगले काम करत असल्याचे सांगितले. या वक्तव्यास आनंद पावडे, सुनील राणे, शंकर मनाळकर, प्रताप पावडे आदींनी विरोध करीत कल्याणकर यांचे नांदेड उत्तर मतदारसंघात समाधानकारक काम असल्याचे सांगितले. त्याचवेळी महायुतीत भाजपाला महत्व दिले जात नाही, असा आरोप करण्यात आला.

या सर्व प्रकारात बालाजी सूर्यवंशी यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्ते थेट धावून गेले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले, मिलिंद देशमुख आदींनी हा वाद मिटवला आणि पुन्हा एकदा बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीस अमोल कदम, मारुती वाघ, साहेबराव गायकवाड, श्रद्धा चव्हाण, महादेवी मठपती, शततारका पांढरे, लक्ष्मीताई वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी करावयाच्या तयारीची चर्चा करण्यात आली.

नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे पराभूत झाले. त्यानंतर या पराभवाच्या चिंतनासाठी पक्षातील वरिष्ठांच्या उपस्थितीसह स्थानिक पातळीवरही अनेक बैठका घेण्यात आल्या. या प्रत्येक बैठकीत वाद निर्माण झाला. अनेकवेळा प्रकरण हातघाईवरही आले आहे. आता महायुतीत नांदेड उत्तरची जागा भाजपाला सोडवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीतही राडा झाला. आगामी काळात भाजपातील अंतर्गत वादासह आता नांदेड उत्तरच्या जागेवरून शिंदे गटाशी भाजपाला दोन हात करावे लागणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!