
नांदेड – नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण यांना तातडीने एअर ॲम्बुलन्सने हैदराबाद येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने आता त्यांच्यावर पुढील उपचार हैदराबाद येथे केले जात आहेत.
नांदेड येथे काँग्रेस पक्षाची विभागीय बैठक रविवारी पार पडली या बैठकीच्या तयारीचा संपूर्ण भार खा. वसंतराव चव्हाण यांच्यावर होता. या आढावा बैठकीच्या नियोजनात त्यांनी पूर्ण वेळ दिला होता. त्यांनी नांदेडची विभागीय बैठक यशस्वी करून दाखवली. या सर्व धावपळीत खासदार चव्हाण यांच्या काही आरोग्य चाचण्या प्रलंबित राहिल्या असल्याची बाबही पुढे आली आहे. त्यात त्यांना दर महिन्याला डायलेसीसही करावे लागते. या सर्व आरोग्य विषयक तक्रारी पाहता त्यांना मंगळवारी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला; तसेच त्यांचा रक्तदाबही कमी होत होता. ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. प्राथमिक उपचारनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आता हैदराबाद येथे हलवण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, प्रकृती अस्वस्थ्यामुळे खा. वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याची माहिती चव्हाण कुटुंबीय, नायगाव तालुका काँग्रेस तसेच नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खा. चव्हाण हे सतत कार्यमग्न असल्याने यादरम्यान त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. पुढील उपचारासाठी त्यांना हैदराबाद येथे हलवण्यात आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त १५ ऑगस्ट रोजी नायगाव येथे आयोजित करण्यात आलेला महाकीर्तन सोहळा व महाप्रसादाच्या कार्यक्रमासह अभिष्टचिंतन सोहळा रद्द करण्यात आला आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व नियोजित अभिष्टचिंतन सोहळे, कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आले आहेत. पुढील उपचार हैदराबाद येथे करण्यात येत आहेत. त्यामुळे जनतेच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी ते नांदेड येथे उपलब्ध राहणार नाहीत, अशी माहिती चव्हाण कुटुंबीय, नायगाव तालुका काँग्रेस तसेच नांदेड शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे.