क्राईम

बिलोलीतील जुगार अड्ड्यावर शहाजी उमापांच्या पथकाची धाड..!

नांदेड जिल्ह्यात आठवडाभरात विशेष पथकाची दुसरी कारवाई, स्थानिक पोलिसांचे लागेबांधे पडले उघडे, कारवाईदरम्यान अनेक जण पळाले 

नांदेड – जिल्ह्यात स्थानिक पोलिसांना हाताशी धरून अनेक अवैध धंदे सुरू असल्याची बाब माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जाहीर भाषणामध्ये बोलून दाखवली आहे. हीच बाब आता स्पष्ट होत असून नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने चार दिवसातच अवैध धंद्यावरील दुसरी कारवाई केली आहे. बिलोली येथे सावळी रोडवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ३ लाख रुपयांच्या रोख रकमेसह एकूण १६ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड आणि चार अंमलदारांच्या समावेश असलेल्या विशेष पथकाने बिलोली शहरानजीक सावळी रोडवर प्रताप अंकुशकर याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईदरम्यान पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख ३ लाख ६ हजार रुपयांसह एक कार, एक ऑटो, १३ मोटरसायकल आणि पाच मोबाईल असा १६ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांच्या हाती पाच जण लागले असले तरीही अनेक जण पळून गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. हे आरोपी पळाले की पळवून लावले याबाबतही आता उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यात काही राजकीय मंडळी असल्याची बाबही चर्चेत आहे. या ठिकाणी त्यांची वाहने सापडली आहेत. या अड्ड्यावर तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात जुगार खेळण्यासाठी जुगारी येत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असताना स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती नसावी याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने ३० जानेवारी रोजी नांदेड शहरातील इतवारा भागात सुरू असलेल्या मच्छी मार्केटमधील एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली होती त्या पाठोपाठ बिलोली जुगार अड्ड्यावरील ही कारवाई स्थानिक पोलिसांच्या हितसंबंधांना उघड करणारी ठरली आहे.

उमरीप्रमाणे बिलोली ठाणे प्रमुखांनाही हटविणार काय..?जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाणे हद्दीतील एका जुगार अड्ड्यावर तीन ते चार महिन्यापूर्वी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली होती. या कारवाईतही जवळपास पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या कारवाईनंतर उमरीचे ठाणे प्रमुख पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांना नियंत्रण कक्षात हलविण्यात आले. त्याच धर्तीवर आता बिलोलीमध्ये २ फेब्रुवारी रोजी जुगार अड्ड्यावरील झालेल्या या कारवाईनंतर बिलोली ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना नियंत्रण कक्षात हलविणार का? असा प्रश्नही आता पुढे आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!