प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यातील २७ लाख ५१ हजार मतदार ठरवणार आगामी विधानसभेचे नऊ आमदार 

विधानसभा निवडणुका घेण्यासाठी प्रशासन सज्ज, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघासाठी अंतिम मतदार यादी जिल्हा निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण २७ लाख ५१ हजार ६३८ मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदार १४ लाख १४ हजार ७२७ आहेत. महिला मतदारांची संख्या १३ लाख ३६ हजार ७४० आहे. तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १७१ इतकी आहे. जिल्ह्यात दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानंतर ३० हजार २१८ मतदारांची वाढ झाली आहे. ही अंतिम मतदार यादी ३० ऑगस्ट रोजी जिल्हा निवडणूक कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात कोणते आमदार निवडून द्यावयाचे ते आता हे २७ लाख ५१ हजार मतदार ठरवणार आहेत.

जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने २० ऑगस्टपर्यंत मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमात ३० हजार २१८ मतदारांची वाढ झाली आहे. ३० ऑगस्ट रोजी अंतिम करण्यात आलेल्या मतदार यादीत किनवट मतदार संघात २ लाख ७४ हजार ६३८ मतदार आहेत. हदगाव मतदारसंघात २ लाख ९५ हजार ८३ मतदार, भोकर मतदारसंघात २ लाख ९९ हजार २२८ मतदार, नांदेड उत्तर मतदार संघात ३ लाख ५४ हजार ८०० मतदार, नांदेड दक्षिण मतदार संघात ३ लाख १३ हजार ६५३ मतदार, लोहा मतदारसंघात २ लाख ९७ हजार ७३८ मतदार, नायगाव मतदारसंघात ३ लाख ६ हजार ३४० मतदार, देगलूर मतदारसंघात ३ लाख ८ हजार ३९० मतदार आणि मुखेड मतदार संघात ३ लाख १ हजार ७६८ मतदार संख्या आहे.

दरम्यान, नांदेड लोकसभेची जागाही खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. ही निवडणूकही विधानसभा निवडणुकांच्यासमवेत होईल की स्वतंत्रपणे घेण्यात येईल? याबाबतही चर्चा सुरू झाली सुरू झाली आहे.  विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होईल अशी शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण…आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी १ ते २८ ऑगस्टदरम्यान पूर्ण करण्यात आली आहे. त्यामध्ये ७ हजार १० बॅलेट युनिट आणि ३ हजार ९२२ कंट्रोल युनिट आहेत. तर व्हीव्हीपॅट मशीनची संख्या ४ हजार २३१ इतकी आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, नायब तहसीलदार भोसीकर, नायब तहसीलदार विजयकुमार पोटे, सतीश कुलकर्णी, नितेशकुमार बोलेलो तसेच इतर २५ कर्मचारी आणि बेल कंपनीच्या १६ अभियंत्यामार्फत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी ३० ते ४० हमालांचेही सहकार्य घेण्यात आले होते. प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर ही सर्व मतदान यंत्रे आगामी निवडणुकीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!