
नांदेड – काँग्रेसमधून २०१४ मध्ये भाजपात, २०२१ मध्ये भाजपातून काँग्रेसमध्ये, २०२४ मध्ये काँग्रेसमधून भाजपात असा राजकीय प्रवास करीत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आता २०२४ मध्येच भाजपातून पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परतले आहेत. मुंबईत झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात नांदेडमध्ये काँग्रेसला नवे बळ देऊ, असा विश्वास भास्करराव पाटील खतगावकर यांनी व्यक्त केला आहे. भाजपात होत असलेली घुसमट पाहता काँग्रेसमध्ये तात्काळ प्रवेश घेत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, डॉ. मीनल खतगावकर यांनीही यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. खतगावकर यांच्या या पक्षप्रवेशाचे काँग्रेसचे महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी स्वागत करताना पक्षाचे वरिष्ठ जे भूमिका ठरवतील त्याची जिल्ह्यात अंमलबजावणी होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडून विकासासंबंधीच्या अपेक्षा फोल ठरल्याने भारतीय जनता पक्ष सोडत असल्याचे माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी आठ दिवसापूर्वीच स्पष्ट केले होते. शंकरनगर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी भाजपा सोडण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब केले. तसेच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. हा प्रवेश नेमका कधी होईल, याकडे लक्ष लागले होते. मुंबईत २० सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलावली होती. आगामी विधानसभा निवडणुका तसेच नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकी संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, डॉ. मीनल खतगावकर याही पोहोचल्या होत्या. नाना पटोले यांच्याशी पक्षप्रवेशासंदर्भाने चर्चा झाल्यानंतर तातडीने त्यांचा मुंबईमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. त्याचवेळी नांदेडमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेस पक्ष प्रवेशाचा मोठा मोठा जाहीर कार्यक्रम होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नांदेडमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या कार्यक्रमात राजकीय वक्तव्यांची, टीकाटिप्पणींची आतापासूनच प्रतीक्षा केली जात आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश घेताच माजी खासदार खतगावकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर कोणतीही टिप्पणी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र भाजपातील अनुभव ते नांदेडमध्ये विस्तृतपणे मांडतील हे निश्चित आहे.
पक्षप्रवेशादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी कोणतीही अट न घेता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले आहे. मात्र काँग्रेस प्रवेश हा आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगानेच करण्यात आला हे लपून राहिले नाही. किंबहुना भाजप सोडतानाच नांदेडमध्ये दादांनी याबाबत वक्तव्य केले होते. त्यामुळे नायगाव विधानसभेसाठी खतगावकर यांच्या सूनबाई डॉ. मीनल खतगावकर या तयारीला लागल्या आहेत तर नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याबाबतही चर्चा सुरू आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुकीसोबत नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक घेतली नाही तर काय? हा प्रश्नही पुढे येत आहे. नायगाव विधानसभेसाठी रवींद्र चव्हाण यांनाही काँग्रेस कार्यकर्ते गळ घालत आहेत. तर डॉ. मीनल खतगावकर या उमेदवारीबाबत ‘अभी नही तो कभी नही’ या निर्णयाप्रत आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र न झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीवर नेमका कोणता तोडगा काढला जाईल, हे मात्र अद्यापही अनिश्चित आहे.
असे असले तरीही मुंबईत झालेला माजी खासदार खतगावकर माजी आमदार पोकर्णा यांचा हा प्रवेश सोहळा नांदेडच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवे वळण देणारा ठरला आहे. २०१४ मध्ये खतगावकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून अशोकराव चव्हाण यांच्याविरुद्ध राजकीय आघाडी उभी केली होती. तीच आघाडी आता पुन्हा एकदा जोमाने कामाला लागणार आहे. कंधारमध्ये ‘दाजी भाऊजी’ चा रंगलेला सामना याबाबत माजी खासदार खतगावकर यांनीच उल्लेख केला. हाच सामना आता नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात रंगणार आहे हेही तितकेच खरे.
नांदेड काँग्रेसला मिळाला नेते पदाचा चेहरा…माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर नांदेड काँग्रेसला चेहरा उरला नव्हता. असे असतानाही लोकांनी निवडणूक हातात घेत लोकसभेला काँग्रेसला यश मिळवून दिले. मात्र खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने पुन्हा एकदा नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यासोबतच आता विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाही होणार आहेत. नेते पदाचा चेहरा नसलेली नांदेड काँग्रेस विधानसभेला कशी सामोरे जाणार याबाबत चर्चा सुरू असतानाच आता माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने नांदेड काँग्रेसला नेता मिळाला हे मात्र निश्चित…