नांदेड – विधानसभा निवडणुकांची घोषणा आज होणार, उद्या होणार याची चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने मात्र विधानसभेसाठी महाराष्ट्रातील ११ उमेदवारांची घोषणा करून आघाडी घेतली आहे. या ११ उमेदवारामध्ये मराठवाड्यातील तीन उमेदवार असून नांदेड जिल्ह्यात नांदेड दक्षिण आणि लोहा – कंधार मतदारसंघाचा समावेश आहे. नांदेड दक्षिणमध्ये वंचितने फारूक अहमद यांना तर लोहा कंधारमध्ये शिवा नरंगले यांना उमेदवारी घोषित केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत निवडणुका होणे अपेक्षित आहे. निवडणुकीची घोषणा आतापर्यंत झाली पाहिजे होती असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. मात्र निवडणुकांची सध्या तरी घोषणा झाली नाही. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागा वाटपांचा तिढा सोडवला जात आहे. दुसरीकडे तिसरी आघाडीही राज्यात उमेदवार देणार आहे. याबाबतही बैठकांचे सत्र सुरूच आहे. या सर्व राजकीय घडामोडी होत असताना वंचित बहुजन आघाडीने मात्र राजकीय आघाडी घेत विधानसभेसाठी राज्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात फारूक अहमद आणि कंधार लोहा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात शिवा नरंगले यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आतापासून हे दोन्ही उमेदवार प्रचाराला लागणार आहेत. हे दोन्ही उमेदवारांनी २०१९ ची विधानसभाही याच मतदारसंघातून लढवली होती. पुन्हा एकदा या दोन्ही उमेदवारांना वंचित ने संधी दिली आहे.
राज्यातील रावेर, सिंदखेडराजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर, नांदेड दक्षिण लोहा, औरंगाबाद पूर्व, शेगाव आणि खानापूर या मतदारसंघाचे उमेदवार घोषित केले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचा ‘एकला चलो रे’ चा नारा… लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेरी झाल्या. मात्र वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकली नाही. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आता कोणत्याही आघाडीत सहभागी होणार नसल्याचे उमेदवारांच्या घोषणेवरून स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी, महायुती किंवा तिसऱ्या आघाडीतही वंचित बहुजन आघाडी आता सहभागी होणार नसल्याचे चित्र दिसत आहे. य वंचित बहुजन आघाडीच्या एकला चलो रे च्या भूमिकेचा आता नेमका कुणाला लाभ आणि तोटा होईल हे निवडणुकीमध्येच स्पष्ट होणार आहे.



