
नांदेड – भीमजयंती.. प्रत्येक आंबेडकरवादी अनुयायाचा मान अन् स्वाभिमान…याच भीम जयंतीसाठी आणि स्वाभिमानाच्या लढाईसाठी धर्माबाद तालुक्यातील माष्टी वासियांचा अनेक वर्षभरापासून लढा सुरू होता. गावकऱ्यांना तालुकास्तरावर कोणताही न्याय मिळाला नसल्याने थेट मंत्रालय गाठण्यासाठी गावकऱ्यांनी माष्टी ते मुंबई असा पायी लॉंग मार्च सुरू केला. १३ एप्रिल रोजी हे गावकरी नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. नांदेडचे संवेदनशील जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी गावकऱ्यांना आपले प्रश्न मार्गी लावले जातील, असे सांगून त्यांना नांदेडमधुनच गावाकडे पाठवले आणि भीम जयंती साजरी करू शकता असे निर्देश दिले. त्यानुसार भीम जयंती साजरीही झाली; मात्र याचाच राग मनात ठेऊन गावात भीम जयंती साजरी करता का? आमच्या घरासमोर झेंडे लावता का असे म्हणत अवघ्या बारा दिवसातच दलित कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात तरुणांसह अनेक महिलाही जखमी झाल्या. या प्रकरणात कुंडलवाडी पोलिसांनी दोन्ही गटातील २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे; मात्र या घटनेने पुन्हा एकदा जातीयवादाचे बीज किती खोलवर रोवले गेले असल्याचेच स्पष्ट होत आहे.
नांदेड जिल्हयातील धर्माबाद तालुक्यातील माष्टी या गावात दोन गटात ८ मे रोजी हाणामारी झाली असल्याचा गुन्हा कुंडलवाडी पोलिसांनी नोंदवला आहे. प्रत्यक्षात केवळ दहा ते बारा घरे असलेल्या दलित वस्तीवर ५०० लोकसंख्येच्या गावातून हल्ला झाला होता. या हल्ल्यात सरपंचासह पोलीस पाटलाचाही समावेश होता असा आरोप दलित कुटुंबीयांनी केला आहे. ८ मे रोजी सायंकाळी झालेल्या या हाणामारीत लाठ्या काठ्याचा मुक्त वापर करण्यात आला. वृद्ध, महिला आणि मुलींनादेखील मारहाण झाली. या मारहाणीत आठ जण जखमी झाले. दरम्यान माष्टी या गावात यंदा पहिल्यांदाच २४ एप्रिल रोजी भीमजयंती साजरी झाली. भीम जयंतीचा हा आनंद साजरा करण्यासाठी अनेक वर्ष बौद्ध समाजाला मोठा संघर्ष करावा लागला. भीम जयंती साजरी करण्यासाठी बुद्ध विहाराला जागा द्या या मागणीसाठी धर्माबाद पंचायत समितीपुढे बारा दिवस गावकऱ्यांना उपोषण करावे लागले. तिथे मार्ग निघाला नाही. त्यामुळे माष्टी ते थेट मंत्रालय मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला. चार दिवस पायी येत हे गावकरी १३ एप्रिल रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. १४ एप्रिल भीम जयंती हा महत्त्वाचा सण, उत्सवही गावकऱ्यांनी नांदेडमध्ये जिल्हा परिषदेपुढे साजरा केला. अखेर संवेदनशील असलेल्या जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या गावकऱ्यांची भेट घेऊन सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. त्याचवेळी माष्टी गावात भीम जयंती साजरी करण्याची परवानगी दिली. माष्टी येथे २४ एप्रिल रोजी पहिल्यांदाच भीम जयंती साजरी झाली. दलितांनी मोठ्या डौलाने आपल्या घरावर पंचरंगी ध्वज, निळे ध्वज फडकवले. या सर्व बाबींचा राग गावातील काहीना होता आणि त्यातूनच आठ मे रोजीची मारहाणीची घटना घडली. गावात भीम जयंती साजरी करता का? आमच्या घरासमोर झेंडे लावता का असे म्हणत घरात शिरून महिला, वृद्ध, मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. लाठ्या काठ्यांसह थेट मिरची पूडचाही वापर करण्यात आला,असा आरोप जखमीनी केला. या मारहाणीचे व्हिडिओही आहेत. ते व्हिडिओ पाहून राज्यभरात या जातीयवाद्यांचा निषेध करून मारहाणीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
याशिवाय गावालगतच्या बौद्ध स्मशानभूमीत भगवा झेंडा लावण्यात आला होता. याबाबत पोलीस तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी तो झेंडा हटवला याचादेखील राग गावातील सरपंच बालाजी कदम आणि त्यांच्या समर्थकांना होता. भीम जयंती साजरी झाली आणि झेंडा हटवला या रागातून एका समाज वस्तीवर हल्ला करण्यात आला. भीमजयंती झाल्यापासून दलित समाजाला दळण दळून देणे, ऑटोतील प्रवास बंद करण्यात आला. गावातील सार्वजनिक फिल्टरचे पाणी देणे बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात दोन्ही गटाच्या परस्परविरोधी तक्रारीवरून कुंडलवाडी पोलिसांनी दोन्ही गटाच्या २५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला. काही आरोपींना अटक करण्यात आली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, हाणामारीची घटना लहान मुलांच्या भांडणातून झाली. भीम जयंती साजरी झाली किंवा झेंडा काढला हे कारण नसल्याचे पोलीस पाटील विठ्ठल जाधव म्हणाले. दुसऱ्या गटाने देखील हे आरोप फेटाळून लावले. मारहाण भीम जयंतीच्या रागातून झाली, झेंडा काढला हे आरोप खोटे असल्याचा दावा दुसऱ्या गटाकडून करण्यात आला. गावकरी प्रकाश जाधव यांनी गावातील दोन्ही समाज सामंजस्याने राहत असल्याचे सांगितले. त्याचवेळी या प्रकरणात बाहेर गावाहून आलेल्या लोकांकडूनच वाद वाढविला जात आहे आम्ही गावकरी एकच आहोत असेही सांगण्यात आले.



