
नांदेड – नांदेड शहरामध्ये आनंदनगर मुख्य रस्त्यावर शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास एका महिंद्रा कारने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. ऐन वर्दळीच्या वेळेतच मुख्य रस्त्यावर आगीची ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. घटनेची माहिती मिळताच नांदेड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने ही आग आटोक्यात आणली.
शनिवारी सायंकाळी आनंदनगर रस्त्यावर रामा फर्निचरसमोर अहमद यांच्या एम. एच. २६ ए.के.४१८९ क्रमांकाच्या या कारला आग लागली. मुख्य रस्त्यावरच ही आग लागल्याने नागरिक भयभयीत झाले. प्रत्यक्षदर्शीनी याबाबत नांदेड महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवले. सायंकाळी सात वाजेदरम्यान माहिती मिळताच अग्निशमन दलाचे प्रमुख निलेश कांबळे आणि सहकाऱ्यांसह अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचला. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटाच्या आत कारला लागलेली आग आटोक्यात आणली. तोपर्यंत जवळपास २५ मिनिट मुख्य रस्त्यावर ही कार जळत होती. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. या आगीमध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या नांदेडकर हे संपूर्ण कुटुंबीयांसह दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच बाजारपेठेत तसेच मुख्य रस्त्यावरही नागरिकांची गर्दी होत आहे. खरेदीसाठी वजीराबाद, श्रीनगर, आनंदनगर, वर्कशॉप, शिवाजीनगर, जुना मोंढा, सिडको, हडको तसेच इतर भागातही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या वर्दळीमुळे सध्या ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. दिवसभर अनेक भागात, मुख्य चौकामध्ये वाहतुकीच्या कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात सायंकाळी वर्दळ आणखी वाढते. आनंदनगर रस्त्यावरही वर्दळ वाढलेली असतानाच शनिवारी सायंकाळी मुख्य रस्त्यावरच आगीचा हा प्रकार घडला. त्यामुळे काही वेळ नागरिकांमध्ये भीती पसरली तसेच वाहतुकीचाही मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला होता. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही.