राजकीय

नांदेड जिल्ह्यात राजेश पवार, डॉ. तुषार राठोड यांनी मारली बाजी, पक्षीय विरोधकांवर मात करून पुन्हा एकदा मिळवले विधानसभेचे तिकीट 

भोकरमध्ये श्रीजया चव्हाण तर किनवटमध्ये भीमराव केराम यांना भाजपाची उमेदवारी घोषित 

नांदेड – भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवारांची यादी घोषित केली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. घोषित केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये तीन विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच भाजपाने रिंगणात उतरवले आहे. तर भोकरमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नायगावात आणि मुखेडमध्ये स्वपक्षीयाकडूनच होणारा विरोध लक्षात घेता नायगावात राजेश पवार यांनी तर मुखेडमध्ये डॉ. तुषार राठोड यांनी बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

भाजपने रविवारी घोषित केलेल्या पहिल्या यादीत राज्यातील ९९ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात श्रीजया अशोकराव चव्हाण यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत असलेले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना भाजपाने राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविले आहे. त्या मतदारसंघात आता श्रीजया चव्हाण रिंगणात उतरल्या आहेत.

किनवटमध्ये विद्यमान आमदार भीमराव केराम यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर राजेश पवार हे नायगावमध्ये भाजपाचे उमेदवार राहतील. नायगाव आमदार राजेश पवार यांच्याविरुद्ध भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध जोरदार मोहीम उघडली होती. राजेश पवार वगळून इतर कुणालाही तिकीट द्यावे अशी मागणीही पुढे करण्यात आली होती. मात्र पक्षाने राजेश पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करीत त्यांना विधानसभेसाठी रिंगणात उतरवले आहे. मुखेडमध्येही विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे. मुखेडमध्येही पक्षांतर्गत विरोधाचा मोठा सामना राठोड यांना करावा लागला होता. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी पाटील खतगावकर  हेही उमेदवारीच्या स्पर्धेत उतरले होते. त्यामुळे महायुतीत ही जागा नेमकी कोणाला सुटेल याकडे मुखेड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले होते. त्यात  खतगावकर यांनीही मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मतदारसंघात वेगवेगळे मेळावे घेत आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी हवा केली. मात्र ही हवा आता गुल झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार डॉ. तुषार राठोड यांनी पुन्हा एकदा बाजी मारत आपली उमेदवारी कायम राखली आहे. भाजपाने नांदेड जिल्ह्यातील तीनही आमदारावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना संधी दिली आहे.

पहिल्या यादीत भाजपाने जिल्ह्यातील नऊ पैकी चार विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली आहे. दुसरीकडे लोहा मतदारसघात माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे तयारीला लागले आहेत. या मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा पक्षाने अद्याप केली नाही. जिल्ह्यातील उर्वरित मतदारसंघ हे महायुतीतील पक्षांना सोडण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे आता दिसत आहे. त्यात भोकर, मुखेड, नायगाव आणि किनवट या चार जागा भाजपाने स्वतःकडे कायम राखल्या आहेत. उर्वरित पाच मतदारसंघ कोणत्या पक्षाला सोडले जातील याकडेही लक्ष लागले आहे. हदगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिणसह लोहा या मतदारसंघात आता महायुतीतील कोणते उमेदवार रिंगणात राहतील याकडेही लक्ष लागले आहे. देगलूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपाला प्रवेश केलेल्या जितेश अंतापूरकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. भाजपाच्या पहिल्या यादीत तरी त्यांची उमेदवारी घोषित झाली नसल्याने आता त्यांना उमेदवारीसाठी प्रतीक्षाच करावी लागणारी आहे. त्यात महायुतीच्या जागावाटपात आणखी काही वेगळा निर्णय होईल काय याची धाकधूकही अंतापूरकर यांना लागली असेल, हेही निश्चित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!