
नांदेड – लोहा विधानसभा मतदारसंघातील एक प्रबळ राजकीय शक्ती असलेले प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी शेकापच्या उमेदवार आशाबाई श्यमसुंदर शिंदे यांच्या पाठीशी राहण्याचा जाहीर निर्णय घेतला आहे. मंगळवारी रात्री त्यांनी छत्रपती शंभूराजे इंग्लिश स्कूलमध्ये उमेदवार आशाबाई शिंदे यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. ज्या पक्षात माझे बाबा दिवंगत डॉ. भाई केशवराव धोंडगे यांची पूर्ण हयात गेली त्या पक्षाचा कंधार लोहा मतदारसंघ बालेकिल्ला होता. आजही त्याच पक्षाचा झेंडा माझ्या घरावर, गाडीवर डौलाने फडकतो, याचा मला अभिमान आहे. आशाबाई शेकापच्या उमेदवार तर आहेतच त्या योग्य उमेदवारही असल्याने मी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रा. पुरुषोत्तम धोंडगे यांनी स्पष्ट केले.
कंधार येथील श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे प्रा. पुरुषोत्तम धोंडगे हे अध्यक्ष आहेत. लोहा मतदारसंघातील ते इच्छूक उमेदवार होते. माजी खासदार व माजी आमदार, शेकापचे दिवंगत नेते डॉ. भाई केशवराव धोंडगे यांचे पुरुषोत्तम सुपुत्र असून भाईंच्या मुशीतून तयार झालेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या एक दीड वर्षापासून त्यांनी विधानसभा लढवण्याची तयारी केली होती. त्याप्रमाणे नियोजनही केले होते. राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाले. पुरुषोत्तम धोंडगे यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या तर्फे मैदानात उतरण्याचे निश्चित करून तशी मोर्चेबांधणी केली. परंतू ऐनवेळी जरांगे पाटलांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेऊन मराठा उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची सूचना केली. जरांगे यांच्या आदेशाला प्रमाण मानून पुरुषोत्तम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. ते कुणाला पाठिंबा देतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. त्यांनी मंगळवारी रात्री संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शेकापच्या उमेदवार आशाबाई श्यामसुंदर शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला.
अर्ज मागे घेतल्यानंतर मी तटस्थ राहिलो असतो. पण माझ्या कार्यकर्त्यांचे काय? हा प्रश्न माझ्यापुढे होता. त्यामुळे माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची व सर्व समाज बांधवांची बैठक घेऊन त्यांचं मन जाणून घेऊन आपण शेकापच्या उमेदवार आशाताई शिंदे यांना पाठिंबा दिल्याचा निर्णय घेतला आहे. आशाताई शिंदे यांच्या विजयासाठी आपली संपूर्ण ताकद लावली जाईल असेही प्रा. धोंडगे यांनी स्पष्ट केले.