नांदेड – एकीकडे भाजपाचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू असताना शेकापच्या आशाताई शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची मुंबईत आज ३ ऑगस्ट सिल्वर ओक येथे बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयावर चर्चा केली. यापूर्वी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे आगामी काळातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटीला महत्त्व प्राप्त होत आहे. कंधार- लोहा विधानसभा मतदारसंघातून आशाताई शिंदे या महाविकास आघाडीच्या उमेदवार मानल्या जात आहेत.
शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी ३ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी शरदचंद्र पवार यांचा आशाताई शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शरदचंद्र पवार व आशाताई शिंदे यांच्यामध्ये लोहा- कंधार मतदार संघातील विविध विषयावर सखोल करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीवर शरदचंद्र पवार व आशाताई शिंदे यांच्यामध्ये यावेळी तासभर चर्चा झाली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतल्याने लोहा -कंधार मतदारसंघात नक्कीच तुतारी वाजणार असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघातील जनतेतून होत आहे. यावेळी कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडेसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महिनाभरापासून त्या मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन आपली भूमिका मांडत आहेत. विकासाचा आराखडा तयार असल्याचे सांगत आगामी काळात आपण मतदारसंघाचा कायापालट करू असे आश्वासन देत आहेत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या परंपरागत कंधार – लोहा मतदारसंघात पुन्हा एकदा विधानसभेची तयारी सुरू केली आहे. या तयारीसाठी त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहेच पण थेट पुणे येथे कंधार, लोह्यातील नागरिकांचा मेळावा घेतला. विधानसभा निवडणुकीत हे मतदार मतदानासाठी आले पाहिजे, या दृष्टीने आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत एकेका मताचे महत्त्व लक्षात घेऊन तयारी केली जात आहे. भाजपाच्या या दोन्ही संभाव्य उमेदवारांची तयारी पाहता नांदेड जिल्ह्यात इतर मतदारसंघातील इच्छुक उमेदवार मात्र सध्या तरी मागे असल्याचे स्पष्ट दिसत आहे.