क्राईम

धर्माबाद नगरपरिषद निवडणुकीत राडा; राज्यात चर्चा..!

प्रशासन म्हणते, त्या प्रकाराची तात्काळ घेतली दखल; गुन्हा दाखल करू, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भाजपासह प्रशासनाला धरले धारेवर..!  जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रकरणाचा मागितला अहवाल

नांदेड – जिल्ह्यातील धर्माबाद नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान झालेल्या राडा राज्यात चर्चेला आला आहे. भाजपा आमदाराकडून मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे प्रारंभी निवडणूक विभागाने असा काही प्रकार घडला नाही असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला; मात्र सायंकाळपर्यंत या प्रकरणात सदरील मंगल कार्यालय चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच या प्रकरणात प्रशासनाची भूमिका संदिग्ध राहिली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या सर्व प्रकाराची माहिती एका स्वतंत्र अहवालाद्वारे मागितली आहे. त्याचवेळी आता या प्रकरणात प्रशासकीय कारवाईही होईल, ही बाबही स्पष्ट झाली आहे.

धर्माबाद नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत आज २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. ही मतदान प्रक्रिया मतदानाच्या पहिल्या टप्प्यापासूनच चर्चेत आली. धर्माबाद येथील ईनानी मंगल कार्यालयात मतदारांना दाबून ठेवण्याची बातमी प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाली. ही माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुरेखा स्वामी आणि धर्माबादचे पोलीस निरीक्षक सदाशिव बडीकर हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या घटनेप्रकरणी त्यांनी प्रारंभी इथे असा कोणताही प्रकार घडला नाही असे सांगितले. नागरिक जमा झाले होते, मंगल कार्यालयातून पळताना थेट छायाचित्रण असतानाही असा कोणताही प्रकार घडला नसल्याची पळवाट त्यांनी काढली. पुढे प्रकरणाचे गांभीर्य वाढत असल्याचे लक्षात येतात प्रशासनाकडून या प्रकरणात आता इनानी मंगल कार्यालय चालकाविरुद्ध जमाबंदी व आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही भूमिका निश्चितच संभ्रम निर्माण करणारी ठरली आहे. पोलिसांनीही योग्य वेळी कठोर कारवाई करणे गरजेचे होते. या घटनेनंतर परिस्थितीचे गांभीर्य पाहून खुद्द पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार हेही धर्माबादेत पोहोचले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

धर्माबाद येथेच बोगस मतदानाचाही आरोप करण्यात आला आहे. धर्माबादमध्ये एका मतदान केंद्रावर तेलंगणातून आलेल्या मतदाराकडून बोगस मतदान होत असल्याची माहिती प्राप्त झाली. बुथवरील महिला कार्यकर्त्यांनी एका बोगस मतदान करणाऱ्या महिलेला पकडले आणि बेदम चोप दिला. या प्रकरणातही मोठा विवाद घडला. मात्र पुढे ती महिला मतदार स्थानिकचीच असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात मतदान केंद्रावर एका महिला मतदारास मारहाण करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाईल याकडेही लक्ष लागले आहे. दुसरीकडे या सर्व प्रकरणाचे चित्रण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधीनाही पोलिसांनी दमदाटी केली इतकेच नव्हे तर अरेरावी केली असा आरोपही माध्यम प्रतिनिधीकडून करण्यात आला.

या प्रकरणात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संवाद साधला असता सदरील प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्व प्रकरणाचा अहवाल मागविण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची भूमिका ही खंबीर असणे गरजेचे होते असे ते म्हणाले. वेळीच सर्व प्रकारावर नियंत्रण मिळवणे गरजेचे होते. पैशांचे प्रलोभन देत नागरिकांना एकत्र करण्यात आले होते हे खरे असले तरीही त्यांना डांबून ठेवले नाही, हेही स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र एकूणच हा प्रकार गंभीर असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणात आता अहवालानंतर पुढे काय असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी थोडीतरी लाज बाळगावी..! दरम्यान, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनीही केली. सपकाळ यांनी या प्रकरणाबाबत समाज माध्यमावर एक पोस्ट करत भाजपचा धर्माबाद तालूकाध्यक्ष गुलाब मारोतराव मोरे, माजी अध्यक्ष विजय डांगे, भाजप आमदार राजेश पवार यांचा अंगरक्षक (तोंडाला रूमाल बांधलेला) यांनी धर्माबाद येथील ईनानी मंगल कार्यालयात मतदारांना डांबून ठेवल्याची घटना अतिशय गंभीर आहे. याच कार्यालयात आमदार राजेश पवार व त्यांच्या सौभाग्यवतीही होत्या असेही काहींचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील निवडणूका आता अशाच मतदारांना डांबून, धाकदपटशाहीने मतदान करवूनच होणार आहेत का? निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी थोडीतरी लाज बाळगावी व महाराष्ट्रातील निवडणूका निरपेक्षपणे होतील याची जबाबदारी ओळखून मतदारांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, असे नमूद करत भाजपने नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानाच्या दिवशी लोकशाहीची हत्या करत मंगल कार्यालयात मतदारांना डांबून ठेवून मतदान करण्यापासून रोखण्यात आले, असे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!