Police

नांदेड शहरात श्री गणेश विसर्जनासाठी पोलीस दल सज्ज – सिटी डीवायएसपी रामेश्वर व्यंजने

श्री गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाच्या उपायोजना अंतिम टप्प्यात, डीजेमुक्त मिरवणुका करण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद

नांदेड – नांदेड जिल्ह्यात आज विघ्नहर्ता श्री गणेशाची उत्साहात स्थापना करण्यात आली असून भाविकांचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. त्याचवेळी प्रशासकीय पातळीवर आता श्री विसर्जन व्यवस्थेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे दुसरीकडे पोलीस दलही वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखत आहे. नांदेड शहरी भागात श्री विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याची माहिती नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांनी दिली.

नांदेड शहरात जवळपास एक हजाराहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे घरगुती गणेशांचीही प्रतिष्ठापना मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. ६ सप्टेंबर रोजी श्री विसर्जन पार पाडले जाणार आहे. या विसर्जनासाठी नांदेड महापालिकेने शहरात २८ संकलन केंद्र स्थापन केले आहेत. त्याचवेळी मोठ्या श्री मूर्तींचे विसर्जन उत्तर नांदेड भागात पुयणी खदान येथे तर दक्षिण नांदेड भागात झरी खदान येथे होणार आहे.

विसर्जन मिरवणूक संदर्भात नांदेड शहर उप विभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांनी सांगितले, शहरात मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण यांनीही विसर्जन मार्गावरील सर्व व्यवस्था कायम राहील यासाठी प्रयत्न केले आहेत. यावर्षी डीजे मुक्त श्री गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यासाठी प्रशासनाने आवाहन केले आहे. या आवाहनाला शहरातील अनेक मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या मिरवणुका डीजे मुक्तच होतील, असा विश्वासही व्यंजने यांनी व्यक्त केला. सुरक्षेच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तसेच गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्यांना विसर्जन मिरवणूक काळात शहराबाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन दिवस असे व्यक्ती शहरात राहणार नाहीत, याचीही पोलीस खबरदारी घेतील असेही ते म्हणाले.

विसर्जन मिरवणूक काळात गणेश मंडळे आणि गणेश भक्तांनी पोलीस तसेच प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, श्रीमूर्ती या संकलन केंद्रावर द्याव्यात तसेच ज्या ठिकाणी विसर्जन करण्यासंदर्भात सूचना आहेत तेथेच विसर्जन करावे असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंजने यांनी केले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात, प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ५२ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे. तर ५२७ सराईत गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या ३ हजार २६७ व्यक्तीवर प्रतिबंधात्मक आदेश बजावण्यात आले आहेत. त्याचवेळी ९०४ जणांना सण, उत्सव काळात जिल्ह्यातून बाहेर काढले गेले असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!