
नांदेड – नांदेड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रपणे लढणार असल्याची घोषणा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी करण्यात आली. त्याचवेळी इतर सर्वच पक्ष मात्र स्वतंत्रपणे रिंगणात उतरले आहेत. महायुतीच्या सर्वच पक्षांनी एकमेकांना युतीच्या चर्चेत शेवटपर्यंत झुलवत ठेवले तर महाविकास आघाडीतील पक्षांचे एकमेकांना प्रस्तावच पोहोचले नाहीत. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी ना महायुती झाली ना महाविकास आघाडी..! दुसरीकडे भारतीय जनता पक्षात बहुतांश निष्ठावंतांना डावलून मटका तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेची ही लढाई यापुढे नेमक्या कोणत्या मुद्द्यावर लढवली जाते याकडेही आता लक्ष लागले आहे. २० प्रभागातील ८१ जागांसाठी १२०३ अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे मंगळवारी शेवटच्या दिवशी तब्बल ९०१ अर्ज उमेदवारांनी दाखल केले आहेत.
नांदेड महापालिका निवडणूक रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने प्रारंभीपासूनच एकला चलो चा नारा दिला होता या नाऱ्याला महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना शिंदे गटाने जशास तसे उत्तर देत आम्हीही कमी नसल्याची भूमिका पहिल्या दिवसापासूनच घेतली होती. त्यामुळे महायुती होणार नाही हे पूर्वीपासूनच स्पष्ट दिसत होते; मात्र वरिष्ठांच्या आदेशानंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात चर्चा सुरू असल्याचे चित्र रंगविण्यात आले. मात्र तो चर्चेचा केवळ फार्स होता हे स्पष्ट झाले आहे. महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला बाजूलाच ठेवले होते. भाजपा नेते अशोकराव चव्हाण यांची भूमिका पाहता राष्ट्रवादीचे नेते आ. प्रतापराव पाटील चिखलीकर आणि शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील यांनी एकत्र येण्याबाबत सुतोवाच केले होते; मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीची युतीही फिस्कटली. ही युती नेमकी का फिस्कटली याचे स्पष्टीकरण अद्याप येऊ शकले नसले तरी या युतीसाठी नांदेड उत्तरचे आमदार तयार नव्हते. त्यांना भाजपासोबत जायचे होते. मात्र भाजपाने शिंदे गटाला शेवटपर्यंत थाराच लागू दिला नाही.
भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमधून आता भाजपात आलेल्या जुन्या नगरसेवकांना तिकीट देण्यात प्राधान्य दिले असल्याचे भाजपा यादीवरून स्पष्ट होत आहे. त्याचवेळी भाजपातील जुन्या निष्ठावंतांना मात्र खड्यासारखे बाजूला करण्यात आले आहे. भाजपाच्या या जुन्या कार्यकर्त्यांचा आक्रोश सोशल मीडियावर दिसत आहे. अनेक निष्ठावंत इच्छुक धाय मोकलून रडत आपल्या भावना व्यक्त करत आहेत. पक्षाचे काम करून आम्हाला फलित काय मिळाले..? हाच प्रश्न पक्ष श्रेष्ठींना विचारला जात आहे. भाजपच्या प्रभाग ९ आणि १० मधून ओबीसी प्रवर्गातून इच्छूक उमेदवार असलेल्या महादेवी मठपती यांनी पक्षाने मटका चालवणाऱ्यांना, बुकी चालकांना तिकीट दिले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपकडून इच्छुक असलेल्या चैतन्य बापू देशमुख, भानुसिंह रावत, दिलीपसिंघ सोडी, सुशीलकुमार चव्हाण, मनोज जाधव, सुनील भालेराव, दिलीप ठाकूर आदींची उमेदवारी कापली. तर महेश खोमणे यांनाही प्रभाग बदलून तिकीट देण्यात आले आहे. यातील अनेकांनी उमेदवारी मिळत नसल्याचे निश्चित होताच शिवसेना शिंदे गटाकडे धाव घेत तेथून बी फॉर्म मिळवले आणि आपली उमेदवारी निश्चित केली. प्रभाग १ मध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेल्या सर्वांनाच तिकीट मिळाली आहेत. प्रभाग दोनमध्येही असेच चित्र आहे. भाजपाने विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या दोन उमेदवारांनाही आपल्या यादीमध्ये संधी दिली आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या यादीत प्रभाग १२ मध्ये सर्व चार मुस्लिम उमेदवारही मैदानात उतरविण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक सातमध्ये मात्र भाजपाचा एकही अधिकृत उमेदवार राहणार नाही, ही बाबही स्पष्ट झाली आहे. सिडकोतील उमेदवारीवरूनही भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना शिंदे गटानेही नांदेड उत्तर मतदारसंघात ४० उमेदवार स्वतंत्रपणे उभे केले आहेत. त्यात आमदार बालाजी कल्याणकर यांच्या सुपुत्राचाही समावेश आहे.
शेवटच्या दिवशी ९०१ उमेदवारी अर्ज… महापालिकेच्या निवडणुकीत बुधवारी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी तब्बल ९०१ अर्ज आले आहेत. ८१ जागांसाठी १२०३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक ६५ अर्ज हे प्रभाग ८ साठी आले आहेत. त्याखालोखाल ६० अर्ज हे प्रभाग ५ साठी तर सर्वात कमी अर्ज प्रभाग ११ साठी आहेत. या प्रभागात २७ अर्ज आले आहेत. ३१ डिसेंबर रोजी या अर्जांची छाननी होणार आहे. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे.



