
नांदेड – आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्या खबरदारीच्या वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. त्याचअंतर्गत गुरुवारी पहाटेपासून शहरातील सहा पोलीस ठाणे अंतर्गत केलेल्या कोंबिंग आणि सर्च ऑपरेशनमध्ये ६५ धारदार शस्त्र, सहा दुचाकीसह एक चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत २०० आरोपींची घरझडती घेण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी स्पष्ट केले. यापुढेही कारवाई सुरूच राहील असे ते म्हणाले. विशेष म्हणजे सर्वाधिक गुन्हे हे नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीत असल्याचे या कारवाईनंतर स्पष्ट झाले आहे.
एप्रिलमध्ये रामनवमीसह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, महावीर जयंती, गुड फ्रायडे असे विविध सण, उत्सव साजरे केले जाणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दलाकडून वेगवेगळ्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शांतता समितीची बैठकही घेण्यात आली. या बैठकीत वेगवेगळ्या सूचना करण्यात आल्या. या बैठकीनंतर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली शहरात गुरुवारी पहाटेच कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. शहरातील सहा ठाणे हद्दीत हे कोंबिंग आणि सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.
या कोंबिंग ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, चार आरसीपी प्लाटूनसह होमगार्ड, पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. या ऑपरेशन दरम्यान ६५ धारदार शस्त्र जप्त करण्यात आले असून या प्रकरणी शहरातील वेगवेगळ्या ठाण्यात १५ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पोलिसांनी सहा दुचाकी आणि एक चार चाकी वाहनही जप्त केले आहे. हे सर्व वाहने चोरीचे असल्याचा अथवा गुन्हे करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचा पोलीस दलाचा संशय आहे. त्याच वेळी रेकॉर्डवरील २०० आरोपींची तपासणी तसेच घरझडतीही या ऑपरेशन दरम्यान घेण्यात आली. पोलिसांची ही कारवाई यापुढेही चालूच राहील, असे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले.