
नांदेड – नांदेड पोलीस परिक्षेत्रीय कार्यालयात स्थापनेनंतर पहिल्यांदाच कार्यालयाची स्वतंत्र वेबसाईट त्यासोबतच ई टपाल प्रणाली आणि क्राईम इन्वेस्टीगेशन मॉनिटरिंग प्रणाली कार्यान्वित केल्याने पोलिसांच्या प्रशासकीय कामाला गती येणार आहेच. त्याचवेळी सामान्य माणसालाही घरात बसून पोलिसांकडे आपल्या तक्रारी करता येतील तसेच गोपनीय माहिती देता येणार आहे. यातून पोलीस विभाग समाजाभिमुख होईल असा विश्वास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केला.
नांदेड पोलीस परिक्षेत्रीय कार्यालयाच्या वेबसाईटचे उद्घाटन मंगळवारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते झाले. यावेळी चासकर बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत विविध विभाग सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस दलानेही सामान्यांना आता ऑनलाईन पद्धतीने तक्रारी करण्याची मुभा उपलब्ध करून दिली आहे. त्याचवेळी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता प्रत्येक गुन्ह्याची अद्ययावत माहिती पोलीस ठाण्यापासून ते पोलीस उप महानिरीक्षकांपर्यंत प्राप्त होईल, याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा निश्चितच उपयुक्त असल्याचेही डॉ. चासकर म्हणाले. एआय, चॅट जीपीटी यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा पोलीस दलाला अधिक गतीने करता यावा यासाठी विद्यापीठात पोलीस विभागासाठी स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
प्रारंभी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी कार्यालयात सुरू असलेल्या होत असलेल्या तीन नवीन प्रणालीची प्रास्ताविकात विस्तृत माहिती दिली. नागरिकांना सेवांचे सुलभीकरण व्हावे यासह पोलीस दलाच्या कामकाजात गती यावी यासाठी हे प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन प्रणाली कार्यान्वित करीत परिक्षेत्रातील सर्व ९१ पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक कार्यालय, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस कार्यालय यासह प्रत्येक ठाणे आता या प्रणालीद्वारे जोडले जाणार आहे. आतापर्यंत ई टपाल सेवेचा वापर पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंतच मर्यादित होता. तो आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. संगणकावर काम गतिमान होईल, असा विश्वासही शहाजी उमाप यांनी व्यक्त केला.
नांदेड रेंज महापोलीस जीओव्ही डॉट इन ही वेबसाईट परिक्षेत्र कार्यालयासाठी तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटमुळे नांदेड परिक्षेत्रातील नागरिकांना पोलीस कामकाजाशी निगडित विविध माहिती अचूक आणि जलदगतीने मिळणार आहे. त्याचबरोबर या वेबसाईटवरून नागरिकांना आपल्या तक्रारी मांडण्याची आणि गोपनीय माहिती पोलिसांना पुरविण्याची देखील व्यवस्था करून देण्यात आली आहे. गुन्हे तपास हे पोलिसांच्या अनेक कामांपकी एक अतिशय महत्त्वाचे काम आहे. पोलीस ठाणे पातळीवर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख रहावी यासाठी ईगल आय क्राईम इन्वेस्टीगेशन मॉनिटरिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. ही सिस्टीम नाशिक येथील माईंड सॉफ्टवेअर आयटी कन्सल्टन्सी यांचे मार्फत विकसित करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्रात ई टपाल प्रणाली देखील कार्यान्वित करण्यात आली आहे. आजपर्यंत पोलीस उप महानिरीक्षक कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय ही टपाल व्यवस्थेने जोडण्यात आली होती. मात्र परिक्षेत्रातील अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कार्यालय आणि पोलीस ठाण्यांचे पातळीवर अशी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. वर्धा येथील ग्रेस इन्फोसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड यांनी सदर कार्यप्रणाली नांदेड पोलीस परिक्षेत्रासाठी उपलब्ध करून दिली आहे. नांदेड परिक्षेत्रातील सर्व ९१ पोलीस ठाणे व इतर क्षेत्रीय कार्यालय ऑनलाईन टपाल व्यवस्थेने जोडली जाणार आहेत. यामुळे वेळेत व खर्चात मोठी बदल होणार आहे.
पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयात झालेल्या समारंभात नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप यांच्यासह इतर पोलीस अधिकारी, अंमलदार हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी केले. आभार प्रदर्शन सहायक पोलीस निरीक्षक दशरथ तलेदवार यांनी केले.