महापालिका

नांदेडमध्ये महापालिका आणि पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत १४० अतिक्रमण हटविले

बाफना टी पॉईंट ते देगलूर नाका भागातील १४० अतिक्रमण धारकांवर धडक कारवाई, तब्बल २ ट्रक माल जप्त

नांदेड :- शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी व वाहतुकीची समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून दक्षिण नांदेड भागातील अतिशय रहदारीचा म्हणून ओळखला जाणारा बाफना टी पॉईंट ते देगलूर नाका या भागातील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या अतिक्रमण धारकांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला. सोमवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने रस्त्याच्या दोन्ही बाजुने झालेले १४० अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले तसेच तब्बल २ ट्रक माल जप्त करण्यात आला आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स. अजितपालसिंघ संधू यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. बाफना टी पॉइंट ते देगलुर नाका ते हैदरबाग या रस्त्यावरील रहदारीस व पादचाऱ्यास अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण धारकांवर कारवाई करून रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला.

या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजीत भोईटे, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, डॉ.मिर्झा फरहतुल्ला बेग, राजेश जाधव, गौतम कवडे, अग्निशमन अधिकारी के.जी. दासरे, अतिक्रमण पथक प्रमुख विशाल सोनकांबळे, अनिल चौदंते यांच्यासह महापालिकेचे ७० कर्मचारी तसेच पोलीस विभागातील ८० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.  महानगरपालिका व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही जंबो कारवाई करून रस्त्यावरील अतिक्रमण हटविले आहे. या अतिक्रमण हटाव मोहिमेचे शहरवासीयांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

महानगरपालिका हद्दीत मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न करता रहदारीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. शहरातील मुख्य रस्ते अथवा इतरत्र अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. यापुढेही महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची मोहिम सुरुच राहील असे महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!