
नांदेड – इच्छुक उमेदवाराचे वय ४५ ते ६० वर्ष यादरम्यान असावे, इच्छुक उमेदवार संघटनेचा अनुभवी कार्यकर्ता असावा, उमेदवाराने यापूर्वी संघटनेच्या जबाबदारीच्या पदावर काम केलेले असावे, तो उमेदवार दोन टर्म सक्रिय सदस्य असला पाहिजे, नवीन पक्ष प्रवेश झालेल्या कार्यकर्त्याचा जिल्हाध्यक्ष पदासाठी विचार केला जाणार नाही या आणि इतर काही अटी होत्या त्या भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी. मात्र नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या महानगराध्यक्ष पदाच्या निवडीत या सर्व अटी बाजूला ठेवून चलनी नाणे पुढे आणत भाजपाने माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांची नांदेड महानगराध्यक्षपदी निवड केली आहे. या निवडीनंतर आता भारतीय जनता पक्षाची सर्व सूत्र माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्याच हाती राहतील हे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी आम्ही जुने जाणते, पक्षाशी एकनिष्ठ आहोत, आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे असे सांगणाऱ्या भाजपातील बाद झालेल्या खोट्या नाण्यांना पक्षाने बाजूला करत आता माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हाती पक्ष सोपवला आहे.
भाजपाचे प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी आज १३ मे रोजी राज्यातील ५८ महानगराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची निवड घोषित केली आहे. त्यामध्ये नांदेडच्या महानगराध्यक्षपदी माजी आमदार अमरनाथ राजुरकर यांची पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने निवड केली आहे. नांदेडमध्ये पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत महानगराध्यक्षासह नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पदासाठी बैठका घेतल्या होत्या. या निवडीसाठी बैठकांची औपचारिकता पार पाडली. पक्षातील जुन्या नव्या नेत्यांची कार्यकर्त्यांची मते या निरीक्षकांनी जाणून घेतली आणि बैठकीचा अहवाल पक्षाकडे पाठवून दिल्याचे सांगून ते आपापल्या कार्यक्षेत्राकडे रवाना झाले. त्यानंतर आता जिल्हाध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागेल याकडे भाजपाच्या सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. काही जुन्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना या नियमावलीमुळे आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती तर पक्षात नव्याने प्रवेश केलेल्यांनाही पदाचा विश्वास होता.
भारतीय जनता पक्षात नवीन प्रवेश करणाऱ्यांना किमान दोन वर्ष तरी संधी नाही असाही एक नियम या निवडीसाठी होता; मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने एक आक्रमक चेहरा म्हणून आणि खा.चव्हाणांची निवड असलेल्या माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्याकडे पुन्हा एकदा नांदेड महानगराध्यक्षपदाची सूत्रे सोपवली आहेत. राजूरकर हे भारतीय जनता पक्षात नवखे असले तरीही काँग्रेसमध्ये असताना त्यांनी जिल्हास्तरापासून राज्यस्तरापर्यंत वेगवेगळी पदे भूषविली आहेत. त्यामुळेच भाजपने त्यांचा हा अनुभव भाजपालाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता स्थापनेसाठी उपयोगात यावा यासाठी त्यांना संधी दिली आहे. त्यात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासाठीही राजुरकर हे हुकमी एक्का आहेत. या सर्व बाबी पाहता राजूरकरांची निवड निश्चितच मानली जात होती.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नांदेड महापालिकेवर भाजपाची सत्ता पहिल्यांदा स्थापन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सहा महिन्यापासूनच तयारी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी प्रारंभीच ‘ एकला चलो रे’ चा नारा दिला होता. त्यासाठी आमदार राजूरकरांचे नियोजन आणि त्यांची कार्यकर्त्यांची फळी कामाला लागली आहे. महायुतीमध्येच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये सुटलेले शब्दबाण पाहता महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह विरोधी पक्षाचे प्रत्येक आव्हान आता भाजपाला पेलावे लागणार आहे. त्यासाठी भाजपही तयार असल्याचे नांदेड महानगराध्यक्ष निवडीवरून स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात स्थानिक पातळीवरच महायुतीचा निर्णय होईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नांदेडमध्ये खा. अशोकराव चव्हाण यांचाच शब्द अंतिम राहणार आहे. चव्हाण यांची नांदेडवरील पकड लक्षात घेता भाजप महापालिकेच्या निवडणुका स्वबळावरच लढेल, हेही आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात नांदेडमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत न दिसता ती महायुतीमध्येच प्रखरपणे दिसून येईल अशीच चिन्ह आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात स्थानिक पातळीवरच महायुतीचा निर्णय होईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नांदेडमध्ये खा. अशोकराव चव्हाण यांचाच शब्द अंतिम राहणार आहे. चव्हाण यांची नांदेडवरील पकड लक्षात घेता भाजप महापालिकेच्या निवडणुका स्वबळावरच लढेल, हेही आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात नांदेडमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत न दिसता ती महायुतीमध्येच प्रखरपणे दिसून येईल अशीच चिन्ह आहेत.


