
नांदेड – नांदेड महापालिकेने बीओटी तत्त्वावर एका खाजगी विकासकास दिलेल्या जागेवर सुरू असलेल्या अवधव्य बांधकामामुळे खोब्रागडे नगरातील चार घरे जमीनदोस्त झाली. त्याचवेळी आणखी आठ ते दहा घरांना तडे गेले असून ही घरेही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत स्थानिक नागरिकांनी मोठा रोष महापालिकेविरुद्ध व्यक्त केला आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही या कामाबाबत खबरदारी घेण्यात आली नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रमुख विरोधकांनीही या घटनेस महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे स्पष्ट करत खाजगी विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या तसेच हे काम तात्काळ थांबविण्यात यावे, असे आदेशही दिले आहेत.
शहरातील नवा मोंढा भागात असलेल्या जवळपास एक एकर जागेवर पुरवठा गोदाम होते. या गोदामातून जिल्हाभर धान्य पुरवठा केला जात होता. पुढे हे धान्याचे हे गोदाम शहराबाहेर हलविण्यात आले त्यामुळे ही जागा रिकामी झाली. जवळपास एक एकरहून अधिक जागा महसूल विभागाने महापालिकेला दिली. पुढे महापालिकेने ही जागा एका खाजगी विकासकाला बीओटी तत्त्वावर विकसित करण्यासाठी दिली. यातून महापालिकेला २० कोटी रुपये महसूल प्राप्त झाला होता. जवळपास तीन वर्षांपूर्वी महापालिकेचे पदाधिकारी असताना ही सर्व प्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर विकासकाने या ठिकाणी मोठे कॉम्प्लेक्स बांधण्याचे काम हाती घेतले. हे काम सुरू असतानाच बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठमोठ्या मशीनरीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. मशिनरीच्या आवाज तसेच व्हायब्रेशनमुळे अनेक घरांना यापूर्वीच तडे गेले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार जिल्हा प्रशासन महापालिका यांच्याकडे तक्रारी केल्या; मात्र त्याकडे कानाडोळा करण्यात आला. त्यामुळे विकासकाने हे काम गतीने सुरू केले. आजघडीला जमिनीतच जवळपास तीन मजली काम पूर्ण झाले आहे. आणखी मशीनरी द्वारे खोदकाम सुरूच आहे. या इमारतीचे जवळपास ११ मजली काम प्रस्तावित असल्याची माहितीही पुढे आली आहे. बाजूला असलेल्या खोब्रागडेनगरच्या बाजूने विकासकाने जमिनीत पिल्लर उभे करून काम सुरू केले होते; मात्र या ठिकाणी असलेली काळी माती लक्षात घेता गेल्या काही दिवसापासून ही जमीन खचत असल्याचे स्पष्ट झाले होते. खोब्रागडे नगरातील अनेक घरांसह मुख्य रस्त्यालाही तडे गेले होते. अशा परिस्थितीत दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक होते; मात्र ती घेतली नाही. मंगळवारी रात्रीपासून या भागातील नागरिकांना धोका जाणवला. त्यामुळे कामाच्या बाजूने असलेली घरे रिकामी करण्यात आली. त्यातच सकाळपासून हे नागरिक चिंतेत होते. बुधवारी दुपारी अचानक तीन वाजेच्या सुमारास चार घरे कोसळली. यात घरातील सर्व सामान जमीनदोस्त झाले. सुदैवाने घरात कोणीही नव्हते. त्यामुळे जीवित हानी टळली.
या घटनेची माहिती समजतात माजी नगरसेवक अशोक उमरेकर हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ याबाबत सर्व यंत्रणांना माहिती दिली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण शहरभर पसरली. त्यामुळे नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनीही येथे भेट देत घटनेची माहिती घेतली. त्याचवेळी माध्यमांशी बोलताना सध्या महापालिकेवर प्रशासक राज असून या घटनेला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही या घटनेप्रकरणी महापालिका प्रशासनावर ठपका ठेवला आहे. हे काम करत असलेल्या विकासकाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. नुकसान झालेल्या कुटुंबीयांना तात्काळ मदत करावी, त्यांचे पुनर्वसन करावे, अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिली आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी या ठिकाणावरील ३० फुटाचा रस्ता विकासकाने गायब केल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवा मोंढा मुख्य रस्त्यापासून हमालपुऱ्यापर्यंत तीस फुटाचा रस्ता होता. तो पूर्वीप्रमाणेच ठेवावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन या ठिकाणी होत असलेले बांधकाम सर्व नियमांचे उल्लंघन करून होत असल्याचे सांगितले. मोठ्या प्रमाणात शहरातील शासकीय जागा या खाजगी लोकांच्या घशात टाकण्याचे काम माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महापालिका आयुक्तही या सर्व बाबीस जबाबदार असल्याचेही ते म्हणाले. हा प्रश्न आपण विधानमंडळात मांडू असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे बिलोलीहून थेट नवा मोंढा भागात दाखल झाले. यावेळी आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता टाकळीकर यांची उपस्थिती होती. पाहणीनंतर जिल्हाधिकारी कर्डिले यांनी ज्या कुटुंबीयांचे घरे कोसळली आहेत त्यांचे तात्काळ पुनर्वसन करण्याचे आदेश दिले. तर महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या प्रकरणात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे तसेच हे काम तात्काळ थांबवावे असे आदेशही दिले आहेत. या ठिकाणी आणखी काही घरे कोसळतील अशी भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
नांदेडमधील एक इंचही जागा शिल्लक ठेवली नाही..!राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही घटनास्थळी भेट देत नांदेडमधील जमिनी बिल्डरच्या घशात घालण्यात आल्या आहेत, त्यातील हे एक पाप आज उघडे पडले असल्याचे सांगितले. महसूलची जमीन खाजगी बिल्डरला देता येत नाही असा महसूलचा कायदा असतानाही ती जमीन कशा पद्धतीने देण्यात आली याची चौकशी करावी. शहरातील कलामंदिरची जागा पद्मश्री शामराव कदम यांच्या काळात सांस्कृतिक चळवळ टिकून राहावी यासाठी एक एक रुपया शेतकऱ्यांकडून जमा करून कलामंदिर उभे करण्यात आले होते. आज तिथे ३०० ते ४०० कोटी रुपयांचा व्यवहार करून ती जागा खाजगी लोकांच्या घशात घातली आहे. अशोक चव्हाण यांनी नांदेड शहरातील एक इंचही जागा शिल्लक ठेवली नाही. ते आदर्शवादी नेते आहेत. त्यांनी राज्यात आदर्श घडवला. नांदेडमध्येही ते आदर्श घडविण्याचा प्रयत्न करत असतील असेही ते म्हणाले. या प्रकरणात संबंधित विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे, जीवितहानी झाली नसली तरीही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा त्याचवेळी ज्यांनी या कामाला परवानगी दिली त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा असे त्यांनी स्पष्ट केले.
नांदेडमधील एक इंचही जागा शिल्लक ठेवली नाही..!


