महापालिका

नांदेड शहरातील कचरा उचलण्यासाठी आता नवा ठेकेदार नियुक्त केला जाणार…!

महापालिकेला दरमहा कोट्यवधीला लुबाडणाऱ्या आर. अँड बी. चा ठेका फेब्रुवारीअखेर समाप्त होणार, झारीतील शुक्राचार्यकडून मात्र पुन्हा एकदा आर. अँड बी. ला ठेका मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू

नांदेड – घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचे बिल घेणाऱ्या पण प्रत्यक्ष घरोघरी जाऊन कचरा न उचलताच शहर कचरामय ठेवणाऱ्या आर.अँड बी. या ठेकेदाराचा शहरातील हे कचरा उचलण्याचा ठेका फेब्रुवारीअखेर समाप्त होणार आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी नव्या ठेकेदाराच्या नियुक्तीसाठी नांदेड महापालिकेने आता निविदा प्रक्रिया सुरू केली असून नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे. आज ९ जानेवारी रोजी या निविदेसंदर्भाने प्री-बीड मीटिंग घेण्यात आली आहे. या बैठकीत निविदा प्रक्रियेत ठेकेदारांना येणाऱ्या अडचणीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस ११ ठेकेदार उपस्थित होते.

नांदेड महापालिकेने शहरातील स्वच्छतेचे आणि कचरा उचलण्याचे कंत्राट २१ फेब्रुवारी २०१८ रोजी आर. अँड बी. या ठाण्याच्या कचरा ठेकेदाराला पाच वर्षासाठी शहरातील स्वच्छतेचे आणि कचरा उचलण्याचे कंत्राट दिले होते. त्यात पुन्हा २०२३ आणि २०२४ या दोन वर्षासाठी या ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा दोन वर्षाचा ठेका वाढविण्यात आला होता. प्रत्यक्षात शहरात अनेक ठिकाणी जागोजागी कचऱ्याचे ढिगारे असतानाही आर. अँड बी. ला मुदतवाढ देण्याची कोणतीही गरज नव्हती. मात्र नांदेड महापालिकेत प्रशासकीय राज आल्यामुळे ठेकेदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे मधुर संबंध या वाढीव करारासाठी कारणीभूत ठरले आहेत. हा ठेका वाढविताना आर एन व्ही ला मोठी दरवाढही मिळाली आहे. त्यामुळे कचरा न उचलताच करारामध्ये वाढीव रक्कम मिळाली असली तरीही आर. अँड बी. ने कचरा न उचलल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट झाला. नांदेड महापालिकेच्या स्वच्छता विभागातील संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील मधुर संबंधातून दिलेल्या मुदत वाढीनंतर आता आर. अँड बी. या ठेकेदाराचा २० फेब्रुवारी २०२५ ला नांदेड महापालिकेसोबत केलेला कचरा उचलण्याचा करार समाप्त होणार आहे. त्यातही कचरा ठेकेदाराने शेवटच्य टप्प्यात विद्यमान आयुक्तांनी या ना त्या कारणामुळे देयक अडविल्याचा आरोप अनेक ठिकाणी केला आहे. दुसरीकडे हा करार समाप्त होण्यापूर्वीच नांदेड महापालिकेने नव्या ठेकेदाराच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. महेशकमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारी २०२५ रोजी निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शहरात स्वच्छतेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी ही प्रक्रिया नियोजित वेळेपेक्षा तीन महिन्यांपूर्वीच सुरू केल्याचे आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी स्पष्ट केले आहे. २०१८ पूर्वी वेळेत शहर स्वच्छता निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ही बाब लक्षात घेता विद्यमान आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी विहित वेळेपूर्वीच निविदा प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. नऊ जानेवारी रोजी या शहर स्वच्छतेच्या निविदे प्रकरणात सहभागी झालेल्या ठेकेदारांच्या अडचणीवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे लवकरच आता शहराला नवा स्वच्छता ठेकेदार मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

वर्षभरात केवळ ५ लाख ३८ हजार रुपये दंड..! शहरात घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचा ठेका घेतलेल्या आर. अँड बी. ने गेल्या पाच वर्षात कधीही घरोघरी जाऊन कचरा उचलला नाही. निविदा प्रक्रियेत प्रत्येक फ्लॅटमध्ये जाऊन कचरा घ्यावा असेही नमूद होते. मात्र आर. अँड बी. ने या अटीचे पाच वर्षात कधीही पालन केले नाही. याकडे महापालिका स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनीही कायम डोळेझाक केली. यात नेमके काय कारण होते हे उघड गुपित आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरातील आर. अँड बी. ला ठोठावलेल्या दंडाचा आकडा बघितल्यास केवळ ५ लाख ३८ हजार रुपये दंड महापालिकेने या ठेकेदारला ठोठावला होता. दरमहा अडीच कोटी रुपये स्वच्छतेसाठी उचलणाऱ्या आर. अँड बी. ने तीनशे ते साडेतीनशे मॅट्रिक टन कचरा उचलल्याचे देयके सादर केली आहेत. प्रत्यक्षात शहरात अनेक ठिकाणी जागोजागी कचऱ्याचे ढिगारे आहेत. त्यामुळे ‘समाधानकारक ‘ काम असलेल्या या आर. अँड बी. ला पुन्हा आता निविदा प्रक्रियेत प्लस पॉईंट देण्याच्या हालचाली सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी मात्र ही बाब फेटाळून लावताना स्वच्छता ठेकेदार निवडीची ही निविदा प्रक्रिया पारदर्शकपणेच सुरू असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!