
नांदेड – ऑटोमध्ये इंधन म्हणून घरगुती वापराच्या गॅसचा वापर करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल २४ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जुन्या नांदेडातील देगलूर नाका भागात ही कारवाई केली आहे.
मंगळवारी विशेष पथकातील अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एस. आरसेवार व पथकातील अंमलदार हे इतवारा हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना देगलूर नाका येथील एमएसईबी कार्यालयासमोर घरगुती वापरासाठी वापरले जाणारे भारत गॅस, एचपी गॅस सिलिंडरमधून इलेक्ट्रिक मोटर व पंपाच्या सहाय्याने गॅस काढून ऑटोमध्ये इंधन म्हणून वापरत आहेत, अशी माहिती मिळाली. या माहितीवरून विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा मारला. त्यावेळी भारत व एचपी गॅस कंपनीचे २४ गॅस सिलिंडर, एक इलेक्ट्रिक मोटार, एक ऑटो, इलेक्ट्रिक वजन काटा यासह रोख २ हजार १५० रुपये जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण २ लाख ६१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी देगलूर नाका भागातील मोहम्मदिया कॉलनी येथे राहणाऱ्या मोहसीन खान मुस्तफा खान पठाण वय ४५ वर्ष आणि सय्यद नवाज सय्यद खुर्शीद वय २२ वर्ष रा. मदिनानगर देगलूर नाका या दोघांविरुद्ध इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार ऑपरेशन ‘फ्लश आऊट’ अंतर्गत विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक आरसेवार यांच्यासह पोकॉ शेख खालील, विलास बोराळे, राजेश नागमपल्ले, पोहेकॉ मारुती सोनटक्के यांचा समावेश होता. या कामगिरीबद्दल विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, सुरज गुरव, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी कौतुक केले आहे.